📍माजी आमदार प्रा.देशकर यांनी मानले वन विभागाचे प्रधान सचिव श्री.मिलिंद म्हैसेकर,उपवनसंरक्षक श्री. सेपट यांच्या सह वन विभाग व पशूवैद्यकीय विभागाचे आभार.
अमरदीप लोखंडे !! सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,17/04/2025 ब्रम्हपुरी तालुक्यातील चिचखेडा, सायगाव, पवनपार या परिसरात मागील अनेक दिवसांपासून मोठ्या पट्टेदार वाघाचा वावर होता. दोन दिवसांपूर्वी चिचखेडा येथील रहिवासी विनायक विठोबा जांभुळे वय वर्षं 60 हे काड्या गोळा करायला गेले असतांना त्यांच्यावर वाघाने हल्ला करुन ठार केले होते.काही महिन्यांपूर्वी सुद्धा एका व्यक्तीला या नरभक्षक वाघाने ठार केले होते व दोन व्यक्तींना जखमी केल्याची घटना घडली होती.
परिसरातील गावांमधील गाय,बैल सारख्या पाळीव प्राण्यांना सातत्याने ठार केल्याच्या घटना घडत होत्या. सदर भागात मानव वन्यजीव संघर्ष वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांमधे भीतीचे वातावरण तयार झाले होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन सदर वाघाला जेरबंद करण्याची मागणी ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुलभाऊ देशकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती.
या बाबत भाजपा नेते माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी थेट महाराष्ट्र शासनाचे वन विभागाचे प्रधान सचिव श्री. मिलिंद म्हैसेकर यांच्या सोबत दूरध्वनी द्वारे चर्चा करत सदर वाघाला जेरबंद करण्याची विनंती केली होती.
स्थानिक स्तरावर सुद्धा माजी आमदार प्रा. देशकर वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. सेपट यांच्या सोबत संपर्कात होते. अखेर आज दिनांक १७ एप्रिल२५ रोजी उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील मेंडकी नियंत्रण कक्षातील चिचखेडा मधील कक्ष क्रमांक १५२ मध्ये या T-3 वाघाला जेरबंद करण्यात आले.
पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पथकाने या नरभक्षक वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे. या उत्कृष्ट कामगिरी बद्दल माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी वन विभागाचे प्रधान सचिव श्री. मिलिंद म्हैसेकर, उपवनसंरक्षक श्री.सेपट यांच्या सह वन विभागाचे व पशूवैद्यकीय विभागाचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.
नरभक्षक T-3 वाघ जेरबंद झाल्याने या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांना नरभक्षक वाघा पासून वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नागरिकांनी भाजपा नेते, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांचे आभार मानले आहेत.