चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम - घोट मार्गावरील दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली ; सख्ख्या भावांसह तिघे ठार.
📍धडक एवढी जोराची होती की अपघातानंतर दुचाकी झाडावर आढळून जळून खाक झाली.
एस.के.24 तास
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील सुभाषग्राम - घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली.यात तिघे ठार झाले.17 एप्रिल ला सकाळी 9:30 वाजता ही घटना घडली.मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.घोट पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत हा अपघात घडला.
साहेब सुभाशिष चक्रवर्ती वय,16 वर्ष,सौरभ सुभाशिष चक्रवर्ती वय,20 वर्ष, दोघे रा.वसंतपूर ता.चामोर्शी व (विशाल भूपाल बच्छाड वय,19 वर्ष, रा.शिरपूर क्र.10 तेलंगणा) अशी मृतांची नावे आहेत.
हे तिघे जण वसंतपूर येथून घोट कडे दुचाकीने जात होते.ठाकूरनगर पहाडी जवळील वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व सागवानाच्या झाडावर आदळली.या धडकेत साहेब आणि सौरभ ही भावंडे घटनास्थळीच मृत्युमुखी पडली.उपचारादरम्यान विशाल बच्छाड याचा मृत्यू झाला.
चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले.दुचाकी चालविणाऱ्या विशालविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक दिलीप सिडाम पुढील तपास करीत आहेत .
दुचाकी जळून खाक झाली : -
धडक एवढी जोराची होती की अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकी पूर्णपणे जळाली.घोट पोलीस मदत केंद्राचे निरीक्षक नीतेश गोहणे हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले.
अपघातांची मालिका कायम : -
14 एप्रिलला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास एटापल्ली- सूरजागड मार्गावरील तुमरगुंडा - आलदंडी गावादरम्यान लोहखनिज वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत दाेघेजण जागीच ठार झाले होते.
नानेश गावडे वय,28 वर्ष व मार्टिन टिग्गा वय,45 वर्ष दाेघेही राहणार पंदेवाही, ता.एटापल्ली,अशी मृतांची नावे आहेत.
नानेश व मार्टिन हे दाेघेही MH.Z 9264 क्रमांकाच्या दुचाकीने एटापल्ली वरून सुरजागड कडे साेमवारी सायंकाळी जात हाेते.याचवेळी सुरजागड कडून मालवाहू ट्रक येत हाेता.
एटापल्ली पासून 10 किमी अंतरावर तुमरगुंडा ते आलदंडीदरम्यान ट्रकने धडक दिल्यानंतर दाेघेही चाकाखाली आले. त्यात त्यांचा चेंदामेंदा झाला.या घटनेची नाेंद पाेलिसांत करण्यात आली.