आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राऊत यांना दुचाकीवर बसवून दाखविले खड्डे,राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह.

आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राऊत यांना दुचाकीवर बसवून दाखविले खड्डे,राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जावरून प्रश्नचिन्ह.


एस.के.24 तास 


गडचिरोली : राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डे,धोकादायक वळणे,तसेच गतिरोधक यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.यासंदर्भातील तक्रारी वाढल्याने 9 एप्रिल रोजी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राऊत यांना दुचाकीवर बसवून या समस्यांकडे लक्ष वेधले. त्यामुळे हजारो कोटी खर्च करून बनवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

शहरातील चामोर्शी मार्ग तसेच आरमोरी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. चंद्रपूर मार्गावर कमी उंचीचे दुभाजक असल्याने मोकाट गुरांचा मुक्त संचार आहे.काही ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल,असे अतिक्रमण,कुठे कमी उंचीचे दुभाजक तर कुठे सिग्नल नसल्याने वाहनचालकांना गोंधळ यामुळे अपघाताचा धोका तर वाढलाच आहे; पण नागरिकांची गैरसोय होत आहे. 

अनेकदा वाहतूक कोंडीदेखील होते. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता ऋषिकांत राऊत यांना बोलावून घेतले.राऊत यांना दुचाकीवर बसवून डॉ.मिलिंद नरोटे यांनी चंद्रपूर रोड वरून फेरफटका मारत समस्या निदर्शनास आणून दिल्या

आमदार डॉ.मिलिंद नरोटेंनी दिल्या या सुचना : -

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अपघातप्रवणस्थळी झेब्रा क्रॉसिंग,सिग्नल यंत्रणा व स्पीड ब्रेकरची व्यवस्था करण्यात यावी. रस्त्यांवरील खड्ड्यांची त्वरित डागडुजी करून समांतर करावेत, रस्त्यांची डागडुजी करावी व दुभाजकांची उंची तातडीने वाढवावी, असे निर्देश आमदार डॉ.नरोटे यांनी दिले.

नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. या कामांवर मी स्वतः लक्ष ठेवणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

कंत्राटदारांवर मेहरनजर : -

गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामातील भ्रष्टाचारासंदर्भात नागरिकांकडून कायम ओरड असते. परंतु काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई होत नाही.जिल्ह्यातून जाणारा 353 सी हा राष्ट्रीय महामार्ग अर्धवट आहे. 

आष्टी ते सिरोंचा पर्यंत असलेला हा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे. कधी वनविभाग तर कधी कंत्राटदाराकडे बोट दाखवून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मोकळे होतात. सोबतच सुरु असलेल्या कामाचा निकृष्ट दर्जाकडे हे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. 

त्यामुळे सर्वसामान्यांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे देसाईगंज ते पुढे कोरची जाणाऱ्या 543 सी या राष्ट्रीय महामार्गाचे देखील बांधकाम मागील वर्षीपासून सुरु आहे.येथे देखील मोठी अनियमितता दिसून येते.

कुरखेडा या महामार्गाची रुंदी कमी केल्याचीही तक्रार करण्यात आली होती.परिस्थिती जैसे थे आहे.गडचिरोली शहरातून जाणारा 930 या राष्ट्रीय महामार्गाबद्दल देखील मोठ्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. 

परंतु येथेही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही.याच महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार डॉ.मिलिंद यांनी या महामार्गाच्या बांधकामावर असमाधान व्यक्त केले होते. 

राष्ट्रीय महामार्गांच्या हजारो कोटींची बांधकामात इतकी मोठी अनियमितता सुरु असताना कुणीही अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही.या प्रकरणी संबंधित कंत्राटदारांना काळ्यायादीत टाकण्याऐवजी त्यांनाच कंत्राट देण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !