कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बहुचर्चित धान खरेदी घोटाळा प्रकरण.
📍उपप्रादेशिक व्यवस्थापक एम.एस.बावणे यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद ; अध्यक्ष,सचिव,संचालक कारवाईची कुणकुण लागताच सर्व आरोपी फरार.
एस.के.24 तास
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बहुचर्चित धान खरेदी घोटाळ्यात अखेर 19 रोजी पहाटे कुरखेडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.उपप्रादेशिक व्यवस्थापक एम.एस.बावणे यांच्यासह विपणन अधिकारी, संस्था पदाधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दोन वर्षांत केलेल्या गैरव्यवहाराची एकत्रित फिर्याद नोंदविण्यात आली असून अटकेच्या भीतीने आरोपी फरार झाले आहेत.
आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेद्वारे केलेल्या धान खरेदीत 2023 - 24 व 2024 - 25 मध्ये मिळून तब्बल 10 हजार क्विंटलची तफावत आढळली होती.
बारदान्यामध्येही अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.दोन्ही वर्षांत एकूण 3 कोटी 95 लाख रुपयांचा गैरव्यवहार समोर आलेला आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दोन्ही वर्षांतील गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा नोंदवून संबंधितांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा व त्या मालमत्तेचा लिलाव करुन त्यातून गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले होते.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आठ दिवस उलटूनही आदिवासी विकास महामंडळाने फिर्याद नोंदविली नव्हती.
अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक येथील व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून गुन्हा दाखल करण्याचे निर्देशीत केले होते. त्यानंतर जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला.
घोटाळा करणारे फरार : -
प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संबारे यांनी आरमोरी चे उपप्रादेशिक व्यवस्थापक हिंमतराव सोनवणे यांना प्राधिकृत केले.सोनवणे यांनी 19 रोजी पहाटे कुरखेडा ठाण्यात फिर्याद दिली.त्यानुसार, कुरखेडाचे प्रादेशिक उपव्यवस्थापक एम.एस.बावणे,विपणन अधिकारी सी.डी.कासारकर,एच.व्ही.पेंदाम व संबंधित अध्यक्ष,सचिव,संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.कारवाईची कुणकुण लागताच सर्व आरोपी फरार झाले आहे.
या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु आहे.संपूर्ण प्रकरणाचा योग्य तो तपास केला जाईल. तपास झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करु.- रवींद्र भोसले,उपअधीक्षक कुरखेडा