बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे हे बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे वारसदार. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांचे प्रतिपादन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१०/०४/२५ बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे वारसदार होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी त्यांच्या विचार आणि कार्याचा रथ पुढे नेण्याचे कार्य केले असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी चे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृति दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.इसादास भडके,ज्येष्ठ साहित्यिक, चंद्रपूर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वावर सखोल विवेचन करतांना राजकारण, समाजकारण, धम्म चळवळ यात त्यांचे भरीव योगदान आहेच पण त्यासोबतच त्यांची संगीत आणि साहित्यात विशेष रुची होती असे प्रतिपादन करून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे गौरव ग्रंथ संपादनाचे कार्य सुरू केल्याचे सूतोवाच केले.
प्रमुख अतिथी अविनाश टिपले, आंबेडकरी साहित्यिक, चंद्रपूर यांनी बॅरिस्टर साहेबांनी बाबासाहेबांचा ‘शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा’ हा मूलमंत्र आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने जगला असे प्रतिपादन करून आजच्या सामाजिक परिस्थितीत भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची अधिक आवश्यकता आहे," असे मत व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा ब्रम्हपुरी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रिमा कांबळे यांनी आपल्या मनोगतात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा देत त्यांच्यातील बाणेदारपणा,कार्यनिष्ठा आणि सामाजिक भान यांचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. बाबासाहेब शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.स्निग्धा कांबळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. तुफान अवताडे यांनी तर आभार प्रा.स्मिता खोब्रागडे यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदा संचालित सर्व शाखेतील शिक्षक,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.