चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील 8 जण आणि चंद्रपूर मधील 7 जण असे एकूण 15 जण पहलगाम काश्मीर येथे अडकून पडले ; चंद्रपूरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू.
एस.के.24 तास
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंडाळाचे सरपंच गणेश गड्डमवार व त्यांचे कुटूंब असे 8 जण तसेच चंद्रपूर शहरातील नगराळे, नळे व गाडीवान कुटूंबातील सात जण असे एकूण पंधरा जण पहलगाम काश्मीर येथे अडकून पडले आहेत. या सर्व 15 पर्यटकांना चंद्रपूरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रपूर शहरातील 3 कुटुंबांतील सात नागरिक देखील पहलगाम येथे अडकले असून, त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नांमुळे हालचालींना वेग आला आहे.
दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी जात असतात. यंदाही काश्मीर खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यामुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत.
यामध्ये चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात सदस्य अडकले असल्याची माहिती मिळताच, आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली.
यावेळी आम्ही हल्ल्याच्या ठिकाणाजवळच थांबलेलो होतो.आम्हाला चंद्रपूरला परत यायचे आहे, मात्र सध्याचे वातावरण पाहता ते शक्य नाही.
आम्ही घाबरलो आहोत असे त्यांनी आमदार जोरगेवार यांना सांगितले. ही बाब गांभीर्याने घेत आमदार जोरगेवार यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके आणि तसेच जम्मू-काश्मीर येथील प्रशासनाशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या कुटुंबाच्या सुटकेसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली.
सदर कुटुंब थांबलेले स्थान आणि त्यांची सर्व माहिती आमदार जोरगेवार यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबांच्या सुरक्षित चंद्रपूर कडे परतीच्या हालचालींना गती मिळाली आहे. अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान, तेजस्विनी गाडीवान असे या कुटुंबियांची नावे असून ते नागीनाबग येथील रहिवासी आहेत.
हे कुटुंब सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत मी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहणार असून, त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत दिली जाईल, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
तसेच नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथील सरपंच गणेश गड्डमवार व त्यांचे कुटूंबिय यामध्ये 3 पुरूष,2 महिला,3 मुली असे एकूण 8 जण पहलगाम येथे अडकून पडले आहेत. त्यांनाही चंद्रपूर येथे सुखरूप आणण्यात येत आहे.