मोहफुल वेचतांना वाघाच्या हल्ल्यात 60 वर्षीय वृद्ध ठार ; आठवड्यातील दुसरी घटना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,13/04/2025 ब्रम्हपुरी पासून 25 कि.मी अंतरावर असलेल्या मेंडकी बीटातील चिचखेडा येथील रहिवासी विनायक विठोबा जांभुळे वय,60 वर्ष चिचखेडा ते मेंडकी कक्ष क्रमांक,1003 मुख्य रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने मोह फुले वेचत असतांना हल्ला केला त्यात जांभुळे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभाग अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन लगेच शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
सध्या ब्रह्मपुरी तालुक्यात वन्यजीवांचे हल्ले मानवावरती वाढत असल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील मानवी जीवन भयभीत झाले आहे.शेतावरती जाणे म्हणजे पुनर्जन्माची शिदोरी डोक्यावरच घेऊन शेतकरी व गुराख्यांना गेल्यासारखे वाटते.वन्यजीव व मानव प्राणी संघर्ष दिवसेंदिवस खूप वाढत आहे.
काल बिबट्याने नांदगाव जानी येथील तीन लोकांना जखमी केले आवळगांव येथील मनोहर सखाराम चौधरी (दिनांक, 04/04/2025)यांची घटना ताजी असतानांच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
वन्यजीव मानव संघर्ष कसा थांबविता येईल आणि वाघाचे हल्ले कसे रोखता येतील यावर उपाययोजना व चिंतन करणे,चिंतनाच्या माध्यमातून जनजागृती करणे ही काळाची गरज झाली आहे.