आत्मसमर्पित माओवाद्यांच्या सर्वंकष पुनर्वसन व कौशल्य विकासाकरिता गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने “ प्रोजेक्ट संजीवनीची ” सुरुवात.
📍 शुभारंभ प्रसंगी 4 रो-हाऊसच्या बांधकामाचे पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन.
एस.के.24 तास
गडचिरोली : (दि.14/04/2025) शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 704 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 55 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2025 साली आतापर्यंत एकुण 22 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचा सर्वंकष विकास होऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामिल होणे सुसह्र व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जात असतात. आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून याच सर्व उपक्रमांचे एकात्मिकपणे सुसूत्रीकरण करुन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने नाविण्यपूर्ण अशा “प्रोजेक्ट संजीवनीची” सुरुवात करण्यात आली.
प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मिळणाया बक्षीस रकमेचे सुलभ वितरण, भूखंड मिळवून देऊन प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजना अंतर्गत गृहप्रकल्प उभारणे, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड आदी ओळखपत्रे उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण – मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम, ब्युटीपार्लर, पशुपालन इ.
लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लि. सारख्या नामांकित कंपन्यांमध्ये वेल्डर, टेक्निशियन, ऑपरेटर इ. प्रशिक्षण व रोजगाराची संधी, महिलांच्या सक्षमिकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना, वैद्यकीय मदत – डोळ्यांच्या उपचारासाठी “ऑपरेशन रोशनी”, तसेच नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, मानसिक व सामाजिक विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार व ध्यान शिबिरे, आत्मसमर्पित माओवादी सदस्यांकरिता सामूहिक विवाह सोहळा व इतर योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सदर प्रोजेक्ट संजीवनीच्या शुभारंभप्रसंगी आज दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते 04 आत्मसमर्पित माओवादी सदस्यांकरिता बनविण्यात येणाया सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा स्वतंत्र 04 रो-हाऊस बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. सदर भूमिपूजन प्रसंगी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल
अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप, प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री. विनोद चव्हाण, स्थागुशाचे पोनि.अरुण फेगडे, जिवीशाचे पोनि. निखिल फटींग, पोस्टे गडचिरोलीचे पोनि. रेवचंद सिंगनजुडे तसेच विविध शाखांचे पोलीस अधिकारी व अंमलदार आणि 50 पेक्षा अधिक आत्मसमर्पित माओवादी सदस्य उपस्थित होते.
सदर शुभारंभप्रसंगी पोलीस अधीक्षक यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, प्रोजेक्ट संजीवनीमुळे आत्मसमर्पित माओवादी संदस्यांना नवजीवनाची संधी मिळून समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी होता येईल.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आत्मसमर्पण शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोउपनि.नरेंद्र पिवाल व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.