बल्लारशाह - गोंदिया या 4 हजार 819 कोटी रुपये खर्चाच्या 250 कि.मी.च्या दुहेरी रेल्वे मार्गावरून काँग्रेस आणि भाजप मध्ये श्रेयवाद.
📍काँग्रेस - भाजप नेत्यांकडून दावे - प्रतिदावे.
एस.के.24 तास
चंद्रपूर : बल्लारशाह - गोंदिया या चार हजार 819 कोटी रुपये खर्चाच्या 250 किलोमीटरच्या दुहेरी रेल्वेमार्गावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाचा भडका उडाला आहे.या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे.
या रेल्वेमार्गाला आपल्याच प्रयत्नांमुळे मंजुरी मिळाल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री तथा मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर,भाजपचे माजी खासदार डॉ.अशोक नेते यांनी केला आहे.तर, काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर व खासदार नामदेव किरसान यांनीही हे आपल्याच पाठपुराव्याचे फलित असल्याचे म्हटले आहे.
या रेल्वेमार्गाच्या मंजुरीची घोषणा होताच भाजपचे माजी खासदार नेते यांनी आपल्याच मागणीमुळे याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले.त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अहीर यांनी हे श्रेय आपलेच आहे,असा दावा केला.
काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली होती.
आपल्या याच मागणीची दखल घेत या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली,असे खासदार धानोरकर यांचे म्हणणे आहे.तर, काँग्रेस खासदार किरसान यांनीही हा रेल्वेमार्ग आपल्यचाच प्रयत्नाचे फलित असल्याचा दावा केला आहे.
एकंदरीत, या रेल्वे मार्गांवरून भाजप आणि काँग्रेस लोकप्रतिनिधींमध्ये श्रेय लाटण्याची स्पर्धा सुरू आहे. यामुळे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच आता हा रेल्वेमार्ग नेमका कुणाच्या प्रयत्नाचे फलित आहे, हे सांगावे, अशी प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटली आहे.