लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,डॉ.संभाजी भोकरे सव्वा लाखांची लाच घेताना अटक.
एस.के.24 तास
भामरागड : काही महिन्यांपूर्वी आजारी असताना हाताला " सलाईन " लावून सेवा देणाऱ्या अतिदुर्गम लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला सव्वा लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
डॉ.संभाजी भोकरे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याने आरोग्य सहायकाकडून थकीत वेतनाचे पुरवणी देयक काढण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती.
नक्षलप्रभावित लाहेरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सहायकाचे फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२४ व नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांचे रोखलेल्या पगाराचे पुरवणी बिल मंजूर करण्याकरता कार्यालयीन प्रमुख म्हणून डॉ.संभाजी भोकरे याचे ना- हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते.
प्रमाणपत्रासाठी डॉ.भोकरे याने २ मार्च रोजी दीड लाख रुपयांची मागणी केली. आरोग्य सहायकाने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे धाव घेतली.यानंतर उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि.संतोष पाटील,शिवाजी राठोड व सहकाऱ्यांनी २५ मार्च रोजी लाच मागणी पडताळणी केली.
त्यात डॉ.भोकरे याने तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार २६ रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार आरोग्य सहायकाकडून रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने डॉ.भोकरे यास जेरबंद केले. त्यास ताब्यात घेऊन लाचेची रक्कम जप्त केली.
काही महिन्यापूर्वी डॉ.संभाजी भोकरे यांनी आजारी असताना हाताला " सलाईन " लावून सेवा देत असल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकले होते.यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव कारण्यात आला होता.लाचखोरीमुळे नाव गमवावे लागले.
नक्षलप्रभावित भागात कारवाई यशस्वी : -
उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले, पो.नि. संतोष पाटील, शिवाजी राठोड, सहायक उपनिरीक्षक सुनील पेद्दीवार, राजेश पद्मगिरीवार, हवालदार किशोर जौंजारकर, स्वप्नील बांबोळे, अंमलदार संदीप उडाण, संदीप घोरमोडे, प्रवीण जुमनाके, हितेश जेट्टीवार, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, राजेश्वर कुमरे आदींनी कारवाई केली.
हा भाग अतिसंवेदनशील व नक्षलप्रभावित असल्याने डॉ. संभाजी भाेकरे यास गडचिरोलीला आणून गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.