" फिक्की " कडून नवी दिल्लीत सन्मान ★ गडचिरोली पोलिसांना दुसऱ्यांदा कम्युनिटी पोलिसिंगसाठी पुरस्कारल

" फिक्की " कडून नवी दिल्लीत सन्मान


गडचिरोली पोलिसांना दुसऱ्यांदा कम्युनिटी पोलिसिंगसाठी पुरस्कार


एस.के.24 तास


गडचिरोली : पोलीस दलाला त्यांच्या ‘प्रोजेक्ट उडान’ या उपक्रमासाठी फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे मागील तीन वर्षात गडचिरोली पोलीस दलाला दुसऱ्यांदा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


गडचिरोली पोलीस दलाचा ‘प्रोजेक्ट उडान’ हा उपक्रम कम्युनिटी पोलिसिंग श्रेणीतून ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’साठी पात्र ठरविण्यात आला होता. भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार वितरण सोहळा फिक्की फेडरेशन हाऊस, नवी दिल्ली येथे मंगळवार, दि.4 रोजी आयोजित केला होता.पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी त्या समारंभाला उपस्थित राहून तो स्वीकारला.ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.


या पुरस्कार सोहळ्यामध्ये माजी केंद्रीय गृहसचिव जी.के.पिल्लई आणि डीजीपी (आरपीएफ) अरुण कुमार यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कारामध्ये कॅाम्युनिटी पोलिसिंग या श्रेणीतून गडचिरोली पोलीस दलाची निवड करण्यात आली.


गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम माओवादग्रस्त भागातील आदिवासी नागरिकांच्या सर्वंकष विकासासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने दि.3 मार्च 2023 रोजी “प्रोजेक्ट उडान” हा उपक्रम सुरु करण्यात आला. जिल्ह्रातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासाकरीता आरोग्य, शिक्षण,रोजगार,कृषी या सर्व आयामांचा विचार करुन प्रोजेक्ट उडानची आखणी करण्यात आली आहे. 


याअंतर्गत शिक्षणाकरीता एक गाव एक वाचनालय, समर-विंटर कॅम्प, स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम, ऑपरेशन रोशनी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र अशा बहुआयामी कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.


एक गाव एक वाचनालय उपक्रमांतर्गत अतिदुर्गत भागातील गावांमध्ये आतापर्यंत सर्व सोयींनी सुसज्ज अशा एकुण 68 वाचनालयांची निर्मिती करण्यात आली आहे. दुर्गम भागातील युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे. 


प्रोजेक्ट प्रयासअंतर्गत एकुण 112 आश्रम शाळांमध्ये इयत्ता 5 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परिक्षेचे आयोजन करुन विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षांकडे कल वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विविध पर्यटन स्थळे, संग्रहालये, विविध संस्कृती यांचे ज्ञान उपलब्ध व्हावे याकरीता आतापर्यंत एकुण 5 समर-विंटर कॅम्पमध्ये 408 विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. 


या सोबतच व्यक्तीमत्व विकासास उपयुक्त असे प्रशिक्षण देण्याकरीता व सामाजिक जाणीव प्रगल्भ होण्याकरीता इयत्ता 8 व 9 वी मधील 300 विद्यार्थ्यांना 5 दिवसीय निवासी स्टुडंट पोलीस कॅडेट शिबिराचा अभिनव प्रयोग गडचिरोली पोलीस दलाकडून करण्यात आला आहे.


याशिवाय 12 हजार 864 युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. 440 युवक-युवतींना संगणकाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या 205 युवकांची निवड राज्यातील विविध पोलीस दलांमध्ये झालेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !