सावली - जिबगांव - हरांबा रस्त्याची दुर्दशा ; तीन वर्षांपासून काम रखडलेले.
📍तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्र्यांना दिले निवेदन.
एस.के.24 तास
सावली : पुरहानी दुरुस्ती व अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत सन २०२१-०२२ या आर्थिक वर्षात सावली तालुक्यातील सावली उसेगाव -जिबगांव -हिरापुर-बोथली-लोंढोली - कढोली - व्याहाड बुज (प्र.जि.मार्ग २८) एकुण लांबी २३.५० किमी.मार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून काम रखडलेले असुन सदर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडलेले दिसत आहेत.
त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली असल्याने सावली,जिबगांव,हरांबा परीसरातील जनतेने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्र्यांना निवेदन दिले व काम पुर्ण करण्याची मागणी केली.
संबंधित रस्त्याला २०२१-२२ मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरणा साठी २४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले,आणि माजी विरोधी पक्षनेते तथा आम.विजय वडेट्टीवार यांनी २०२२ मध्ये भुमिपुजन करून काम सुरू केले.परंतु मागील तीन वर्षांपासून काम रखडलेले आहे.आणि सध्या स्थितीत कंत्राटदाराने काम बंद केले.
त्यामुळे रखडलेल्या रस्त्यावर खड्डे पडले असून अनेक मोठे व किरकोळ अपघात सुध्दा घडलेले आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाला नागरीकांनी विचारणी केले असता सदर रस्त्यावर निधीच मंजूर नाही असे सांगण्यात आले,मग निधी नसताना भुमीपुजन व काम कसे काय सुरू झाले?असा प्रश्न संबंधित गावातील नागरिकांना पडला आहे.
चंद्रपूर - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गानंतर दुसरा सावली जिबगांव हरांबा मार्ग आहे,जो गडचिरोली जिल्ह्यात जोडला जातो, तसेच संबंधित गावातील नागरिकांना सावली तालुका मुख्यालयी येताना हाच मार्ग असल्याने संबंधित रस्त्याची योग्य चौकशी करून काम त्वरित पुर्ण करावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
निवेदन देताना राकेश गोलेपल्लीवार,मिथुन गेडाम, रमेश कन्नाके,सुरेश दासरवार,नरेश गडपल्लीवार,प्रमोद लोणारे,तुषार धोटे,अनिल नल्लुरवार,बंडु दुधे,शरद वाढ ई, बंडु नरुलवार,रुर्षी पाल,आदेश दुधे,विजय गडपल्लीवार, फिरोज खोब्रागडे,मारोती डासलवार व परीसरातील नागरीक उपस्थित होते..