दारूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यक्तीने पाठलाग करणाऱ्या पोलिसाच्या दुचाकीला लाथ मारल्याने एका पोलिसाचा मृत्यू ; सहकारी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी.
एस.के.24 तास
बुलढाणा : दारूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यक्तीने आपला पाठलाग करणाऱ्या पोलिसाच्या दुचाकीला लाथ मारल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला.त्यांचा सहकारी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अपराध्याचे मनोधैर्य किती वाढले याचे ज्वलंत उदाहरण ठरलेल्या या घटनेने जिल्हा पोलीस दल अक्षरशः हादरले आहे.
जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे.त्यातील बहुतेक जणांना प्रभावी ‘आका’ चे, कधी राजकारण्याचे पाठबळ असते.विविध कारणामुळे त्यांचे मनोधैर्य कमालीचे वाढल्याचे, त्यांची हिम्मत,अरेरावी वाढल्याचे दिसून येते.दुसरीकडे पोलिसांचे मनो धैर्य, दरारा विविध कारणामुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनतेचा कायद्यावरील विश्वास कमी झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
२३ मार्चला भर दिवसा घडलेल्या या अभूतपूर्व आणि तितक्याच भीषण घटनेने ही बाब सिद्ध झाली आहे. अंढेरा पोलीस ठाणे हद्धीत ही घटना घडली असून मृत पोलीस आणि जखमी हे अंढेरा पोलीस ठाण्याशी संबंधित आहे.या भीषण घटनाक्रमात एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारली.
पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ जवळ ही घटना घडली आहे. दोन्ही पोलीस कर्मचारी अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते.भागवत गिरी असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे नामक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे.
येथे प्राप्त माहितीनुसार अंढेरा पोलीसठाण्याचे पोलीस कर्मचारी राम आंधळे आणि भागवत गिरी दुचाकीने शेळगाव आटोळ परिसरात ‘पेट्रोलिंग’ करत होते. शिवणकर नामक अवैध दारू विक्रेता दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळकडे येत होता.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने पाठलाग सुरु करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला.आता आपण पकडले जाऊ याची खात्री झाल्याने मिसाळवाडी ते शेळगाव आटोळच्या मध्ये शिवणकरने पोलिसांचा दुचाकीला लाथ मारली.
त्यामुळे भर वेगातील दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन जोराने धडकली. यात दुचाकी चालवणारे भागवत गिरी यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी पोलीस राम आंधळे यांना घेऊन कृष्णा मिसाळ यांनी चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेनंतर शिवणकर घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील अंढेरा येथे दाखल झाले आहे. या घटनेने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याच्या रक्षकाचा दुर्दैवी करुण अंत झाल्याने पोलीस कर्मचारी व समाज मन प्रक्षुब्ध झाले आहे.