यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केशव ठाकरे एका कुरिअर सेवेच्या " डिलीव्हरी बॉय ने सर " म्हटले नाही म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांसह केली बेदम मारहाण
★ २३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली
एस.के.24 तास
यवतमाळ : एका कुरिअर सेवेच्या " डिलीव्हरी बॉय " ने फोन केल्यानंतर " सर’ म्हटले नाही म्हणून या क्षुल्लक कारणावरून भडकेलेल्या पोलीस निरीक्षकाने डिलीव्हरी बॉयला अश्लील शिवीगाळ केली. त्यांनतर चार पोलीस कर्मचाऱ्यांसह कुरिअरच्या ऑफिसमध्ये जावून त्याला मारहाण केली.
आर्णी येथे २३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या घटनेने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. सध्या समाज माध्यमांत ही संभाषणाची ऑडिओ व मारहाणीची विडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे.
आर्णी येथील सनराईज लॉजेस्टिकमधील डिलिव्हरी बॉय धीरज गेडाम, रा.आर्णी हा पार्सल पोहचविण्याचे काम करतो.आर्णी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केशव ठाकरे यांच्या नावाने पार्सल आले होते.त्यावर केवळ केशव ठाकरे
आर्णी व मोबाईल क्रमांक लिहिलेला होता.खात्री करण्यासाठी डिलिव्हरी बॉयने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला व केशव ठाकरे बोलताय का ? असे विचारताच पारा भडकलेले ठाणेदार केशव ठाकरे यांनी " केशव ठाकरे तुझा नोकर आहे का ? कोणाशी बोलतो माहित नाही का ?
मी इथला ठाणेदार आहे ? असे म्हणत त्या मुलास शिव्यांची लाखोळी वाहिली व जिथे असशील तेथे येवून तुला दाखवतो, मी कोण आहे ते, असे म्हणत दमदाटी केली.
त्यानंतर ते चार कर्मचाऱ्यांसह कुरिअरच्या कार्यालयात गेले. तेथे डिलिव्हरी बॉयची कानउघाडणी करत त्याच्या कानशिलातही लगावली.हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या डिलिव्हरी बॉयने केलेला कॉल व त्याला ठाणेदारांनी शिव्या घालत दिलेले उत्तर हे संभाषण समाज माध्यमांत व्हायरल झाले. तसेच कुरिअरच्या कार्यालयातील मारहाणीचा प्रसंगही व्हायरल झाला आहे. टवाळखोर गुंडाप्रमाणे ठाणेदार आणि त्यांचे कर्मचारी या दुकानात शिरतात.
तेथील कर्मचाऱ्यास मारहाण करतात, ऐटीत बसतात. एखाद्या दक्षिण सिनेमाप्रमाणे हा सर्व घटनाक्रम बघायला मिळतो. डिलिव्हरी बॉयने या प्रकरणी अद्याप तक्रार दिली नाही. गेल्याच आठवड्यात आर्णी पोलिसांनी धाड टाकल्यानंतर एका दारू विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती.आता ठाणेदारांच्या वर्तणुकीचा हा प्रकार उजेडात आल्याने वर्दीतील पोलिसच गावगुंडाप्रमाणे वागू लागले तर जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी, हा प्रश्न आर्णीकर विचारत आहेत.
घटनेमागे रेती तस्कर!
आर्णी येथे घडलेल्या घटनेसंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना विचारणा केली असता, ठाणेदार केशव ठाकरे यांना जाणीवपूर्वक अडकविण्यासाठी रेती तस्करांनी हा प्रकार केल्याचे अजब उत्तर दिले.
आपल्याला अशीच माहिती देण्यात आली, असे त्यांनी सांगितले. मात्र घडलेला प्रकार चुकीचा असून, ठाणेदारांना समज देवू, असे अधीक्षक चिंता बोलताना म्हणाले. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी ठाणेदार केशव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी प्रतिसाद दिला नाही.