गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना काठीने व चप्पलेने केली मारहाण.
एस.के.24 तास
अहेरी : अहेरीत तीन वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या एकलव्य मॉडेल निवासी स्कूलमध्ये अधीक्षकाने आदिवासी विद्यार्थ्यांना चप्पलेने मारहाण केली.4 ते 5 विद्यार्थ्यांनी याबाबत नातेवाईकांना कळविल्यानंतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी 27 रोजी एकलव्य स्कूलमध्ये धाव घेत या प्रकरणाला वाचा फोडली.
या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य मॉडेल निवासी स्कूल चालविले जातात.यानुसार अहेरीत देखील हे स्कूल असून तेथे सातशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.25 मार्च रोजी दुपारी जेवणानंतर काही मुले आपल्या खोलीत जाऊन झोपली होती.
यावेळी वसतिगृह अधीक्षक ईश्वर शेवाळे याने त्यांना काठीने व चप्पलेने मारहाण केली. यानंतर एका विद्यार्थ्यास अभ्यास करताना स्टडी रुममध्ये झोप लागली. त्याला देखील चप्पला व काठीचा मार देण्यात आला, अशा आशयाच्या तक्रारीने एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा कसा छळ सुरु होता.
हे समोर आले आहे.यांसदर्भात अहेरीचे उपविभागीय अधिकारी व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांना संपर्क केला त्यांनी कॉल घेतला नाही.त्यामुळे प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही.
पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट : -
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष नागेश मडावी व इतर आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एकलव्य स्कूलमध्ये सुरु असलेल्या अधीक्षकाच्या मनमानीचा पाढा वाचून दाखविला. अधीक्षक ईश्वर शेवाळे याच्यावर गुन्हा नोंदवून कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
फोन वरुन सांगितली आपबिती : -
25 मार्चची घटना 27 रोजी समोर आली. स्कूल निवासी असल्याने खूप बंधने आहेत, त्यामुळे या घटनेची कोणीच वाच्यता करणार नाही,असा अधीक्षक ईश्वर शेवाळे चा भ्रम होता, पण एका विद्यार्थ्यांने गुपचूप आपल्या नातेवाईकास फोन करुन हुंदके देत आपबिती सांगितली.
त्यानंतर नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्त्यांना कळवले , त्यानंतर त्यांनी वसतिगृहात जाऊन जाब विचारला.
विद्यार्थी दहशतीत : -
एकलव्य मॉडेल स्कूलमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधीक्षक ईश्वर शेवाळे हा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करत होता. मात्र, त्याच्या दहशतीमुळे विद्यार्थी कुठे याबाबत ब्र शब्द काढत नव्हते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या पायावर केलेल्या मारहाणीचे फोटो समाजमाध्यमात प्रसारित झाले, त्यानंतर सर्वस्तरातून रोष व्यक्त करण्यात आला.