फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न,विधानसभेत ठराव संमत.
एस.के.24 तास
चंद्रपूर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्याबाबत आ.सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडलेला ठराव पारित करण्यात आला.
“ भारतरत्न ” हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते.क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित, वंचितांच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश निर्माण करत, सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून, अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे.
त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानीत करावे तसेच राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव, भारत सरकारकडे पाठवावा, असे या ठरावात म्हटले आहे.
महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम ११० नुसार, महाराष्ट्र विधानसभा याद्वारे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना “भारतरत्न” या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानीत करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे, असे देखील या ठरावात म्हटले आहे. हा ठराव आज विधानपरिषदेत मांडण्यात येणार आहे.
७ मार्च रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत वरील मागणीच्या अनुषंगाने अशासकीय ठराव मांडला व चर्चा घडवून आणली. याविषयी विधिमंडळात ठराव पारित करून तो केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले होते.
या आश्वासनाची पूर्तता महायुती सरकारने केली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील विधानसभा सदस्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी नेणार असल्याचे आश्वासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.