महाड सत्याग्रह : सामाजिक न्यायासाठीचा क्रांतिकारी एल्गार. - प्राचार्य डॉ.देवेश कांबळे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,२२/०३/२५ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिऊन केवळ दलितांच्या हक्काची लढाई लढली असे नाही, तर संपूर्ण समाजाच्या समतेसाठीचा निर्णायक संदेश दिला. हा सत्याग्रह केवळ इतिहासातील एक घटना नसून, आजच्या समाजासाठीही प्रेरणादायी आहे.
मात्र आज सत्य आणि न्यायासमोर असत्य आणि अन्यायाचे संकट उभे आहे. समाजात सत्यासाठी लढणारे कमी होत आहेत, तर अन्याय करणाऱ्यांचे बळ वाढत चालले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या समतेच्या आणि धम्माच्या मार्गावर आपण चालतो आहोत का ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.असे परखड मत महाड सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपूरी येथे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. रुपेश मेश्राम यांनी महाड सत्याग्रहाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक परिणामांवर सखोल विवेचन करताना महाड सत्याग्रह हा फक्त एका तळ्यातील पाण्यासाठी नव्हता तर हा लढा दलितांच्या मूलभूत हक्कांसाठी,स्वाभिमानासाठी आणि माणूस म्हणून त्यांना मिळणाऱ्या सन्मानासाठी होता असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तुफान अवताडे यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.