आरोपी रोहित विनोद उर्फ बबलु ठाकूर व अभिषेक विनोद उर्फ बबलु ठाकूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंग घाेटाळा प्रकरण ★ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंद्रपूर व नागपुरातील १३ कोटी ७१ लाखाची मालमत्ता जप्त केल्याने खळबळ

आरोपी रोहित विनोद उर्फ बबलु ठाकूर व अभिषेक विनोद उर्फ बबलु ठाकूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंग घाेटाळा प्रकरण


★ सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंद्रपूर व नागपुरातील १३ कोटी ७१ लाखाची मालमत्ता जप्त केल्याने खळबळ


एस.के.24 तास


चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन बुकिंग घाेटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चंद्रपूर व नागपुरातील १३ कोटी ७१ लाखाची मालमत्ता जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणात मुख्य आरोपी रोहित विनोद उर्फ बबलु ठाकूर व अभिषेक विनोद उर्फ बबलु ठाकूर आहेत. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी ८ जानेवारी रोजी ईडीने भल्या पहाटे ठाकूर यांच्या प्रतिष्ठानांवर तसेच बंगल्यावर एकाच वेळी छापे टाकले होते.


सक्तवसूली संचालनालयाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) मधील ऑनलाइन टायगर सफारी बुकिंग घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात १३.७१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यातील अनेक स्थावर मालमत्ता आणि विविध बँक खात्यांमध्ये जमा केलेल्या पैशांचा समावेश आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत ही कारवाई केली आहे.

स्थानिक रामनगर पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने तपास सुरू केला होता. 

वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स (WCS) चे भागीदार अभिषेक विनोद कुमार ठाकूर आणि रोहित विनोद कुमार ठाकूर यांनी आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहाराद्वारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संरक्षण प्रतिष्ठानची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग, प्रवेश शुल्क, जिप्सी शुल्क आणि मार्गदर्शक इत्यादींसाठी शुल्क गोळा करण्याची जबाबदारी WCS ला देण्यात आली होती.

परंतु आरोपींनी कराराच्या अटींचे उल्लंघन केले आणि २०२०-२१ ते २०२३-२४ या कालावधीत १६.५ कोटी रुपयांची उधळपट्टी केली.विशेष म्हणजे ८ जानेवारी २०२५ मध्ये, संक्त वसूली संचालनालयाने अनेक ठिकाणी छापे टाकले आणि १.४२ कोटी रुपयांचे सोने, प्लॅटिनम आणि चांदी तसेच अनेक डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली. 

केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने उघड केले की आरोपींनी घोटाळ्यातून कमावलेल्या पैशाचा वापर (गुन्ह्याची रक्कम – पीओसी) काही कंपन्यांच्या नावे वैयक्तिक मालमत्ता आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि जुनी कर्जे फेडण्यासाठी वापरली. आता ईडीने १३.७१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईडी अशा प्रकरणांचा वेगाने तपास करत आहे. 

२०२५ मध्येच अनेक घोटाळे उघडकीस आले असून आरोपींची कोट्यवधींची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे.ताडोबा प्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक तथा मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दोन वर्षापूर्वी २०२३ मध्ये उघडकीस ऑनलाईन बुकींग घोटाळा उघडकीस आणला होता. 

या प्रकरणी डॉ.रामगावकर यांच्या तक्रारीवरून. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर ८ एप्रिल २०२४ रोजी रोहित व अभिषेक ठाकूर या दोन्ही भावंडांना रामनगर पोलिसांनी अटक केली होती. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता १२ एप्रिल पर्यंत दोघेही पोलीस कोठडीत होते.  

नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.ठाकूर बंधू यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने जामिन देण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच न्यायालयाने ठाकूर बंधू यांना पैसे जमा करण्यास सांगितले होते.तेव्हा ठाकूर यांनी २ कोटी ४१ लाख रुपये जमा केले आहेत.

१२ ऑक्टोबरपर्यंत ३ कोटी रुपये जमा करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.ठाकूर बंधूंनी उर्वरित ३ कोटी रुपये जमा करण्यासाठी पुन्हा मुदत मागितली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच ८ जानेवारी २०२५ रोजी सक्त वसूली संचालनालयाने चंद्रपुरात ठाकूर यांचे प्रतिष्ठान व बंगल्यावर छापा मारला होता. 

यावेळी ठाकूर बंधू यांच्या सरकारनगर येथील निवासस्थानी तसेच दोन स्वाद हॉटेल, रेल्वे स्थानक मार्गावरील हॉटेल गणपती, एक पेट्रोल पंप व बेकरी ब्लिसचे चार प्रतिष्ठाने तसेच इतर प्रतिष्ठान येथे छापे टाकले. कागदपत्रांची तपासणी केली होती. विशेष म्हणजे क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनीच ईडी कडे या प्रकरणाची तक्रार केली होती.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकींसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशन व रोहित व अभिषेक ठाकूर संचालक असलेल्या चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन या कंपनीत करार झाला होता. 

या करारानुसार ऑनलाईन बुकींगचे सर्व पर्यटकांचे पैसे ठाकूर यांंच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा होत होते. या खात्यातून ताडोबातील जिप्सी, गाईड तथा इतर सर्वांना ठाकूर यांना नियमित पैसे द्यायचे होते.मात्र. ठाकूर यांनी पैसे दिले नाही. ठाकूर यांच्या खात्यात जवळपास २२ कोटी ८० लाख रूपये जमा झाले. 

यातील केवळ १० कोटी ६५ लाख रूपये ठाकूर यांनी जमा केले. उर्वरीत रकमेचा अपहार केला. हा अपहार लेखापरिक्षणात उघडकीस आला. त्यानंतर तेव्हाचे ताडोबा कोरचे उपसंचालक नंदकुमार काळे व संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी पोलीस तक्रार केली होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !