भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागाच्या जि.प.शाळेत मुख्याध्यापकाने 4 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस.
★ 2 आठवड्यात 2 घटना ; मुख्याध्यापकास अटक.
एस.के.24 तास
भामरागड : तालुक्यातील एका अतिदुर्गम गावातील जि.प.शाळेत मुख्याध्यापकाने वर्ग 3 री,वर्ग 4 थी, वर्ग 5 वी च्या वर्गातील 4 विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याची घटना ताजी असतानाच भामरागड मुख्यालयातील एका समूह शाळेत देखील मुख्याध्यापकाने अशाच पध्दतीने अश्लाघ्य कृत्य केल्याचे 11 मार्च रोजी समोर आले.
पोलिसांच्या माहितीनुसार,मालू नोगो विडपी वय,50 वर्ष असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.तो भामरागड येथील समूह जि.प.शाळेत कार्यरत आहे.या शाळेत पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची निवासी व्यवस्था आहे.
काही दिवसांपासून मुख्याध्यापक मालू विडपी हा शाळेतील पहिली व दुसरीत शिकणाऱ्या दोन मुलींशी अश्लील चाळे करत होता. यासंदर्भात पीडितेच्या कुटुंबीयांनी 11 मार्च रोजी भामरागड ठाण्यात तक्रार दिली,त्यानंतर पोलिसांनी चौकशी करुन मुख्याध्यापक मालू विडपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.
दोन आठवड्यात दोन घटना : -
5 मार्च रोजी भामरागड तालुक्यातील एका अतिदुर्गम भागातील जि.प.शाळेत मुख्याध्यापकाने 4 विद्यार्थिनींची छेड काढल्याचे प्रकरण समोर आले.भामरागड तालुक्यातील कुक्कामेटा या आदिवासी बहुल गावातील जि.प.शाळेत मुख्याध्यापक असलेला आरोपी रवींद्र गव्हारे याने 4 विद्यार्थिनींसोबत गैरकृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
तपासात पीडित विद्यार्थिनींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एका महिला पालकाच्या तक्रारी वरुन लाहेरी उप पोलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द 5 मार्च रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रारदार महिलेच्या 9 वर्षीय मुलीसह नात्यातील 11 वर्षीय मुलगी व अन्य 2 मुलींना रजिस्टर आणून देण्याच्या बहाण्याने आपल्या दालनात एकेकटी बोलावून गेल्या 8 दिवसांपासून तो त्यांच्याशी अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कारवाईचे आदेश दिल्यावर उपनिरीक्षक सचिन सरकटे यांनी गुन्हा नोंदवून घेत मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याच्या मुसक्या आवळल्या.
सीईओंनी दिली होती भेट : -
नव्याने रुजू झालेले जि.प.सीईओ सुहास गाडे यांनी भामरागड दौऱ्यात समूह निवासी जि.प. शाळेला दहा दिवसांपूर्वी भेट दिली होती. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थिनींसोबत संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या होत्या.यानंतर आता ही धक्कादायक घटना समोर आली आहे.