चंद्रपूर व गडचिरोली या 2 जिल्ह्यांतील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरांत जात असल्याने गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थीसंख्येला गळती. 📍हळुहळू गोंडवाना विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा खालावण्यास सुरुवात.

चंद्रपूर व गडचिरोली या 2 जिल्ह्यांतील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरांत जात असल्याने गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थीसंख्येला गळती.


📍हळुहळू गोंडवाना विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा खालावण्यास सुरुवात.


एस.के.24 तास 


गडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांतील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरांत जात असल्याने गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थीसंख्येला गळती लागली आहे. मागील दोन वर्षांत विद्यार्थी संख्या २० हजाराने कमी झाली आहे. त्यामुळे आता शाळांपाठोपाठ गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनाही विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.

चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी २०११ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. विद्यापीठांतर्गत या दोन जिल्ह्यांत दोनशे महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांत सुरुवातीला लाखो विद्यार्थी विविध शाखांमध्ये शिक्षण घेत होते. 

हळुहळू गोंडवाना विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा खालावण्यास सुरुवात झाली.याचबरोबर विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दिल्ली, मुंबई, पुणे,नागपूर, नाशिक, हैदराबाद व बंगळुरू, या मोठ्या शहरांत जाण्यास सुरूवात झाली. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे.२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात ७४ हजार ५६४ विद्यार्थी शिक्षण घेत होते. 

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ही संख्या १७ हजाराने कमी होवून ५७ हजार ६६ इतकी झाली. २०२४-२५ या चालू शैक्षणिक वर्षात ही संख्या ५४ हजार ९०९ इतकी आहे. गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थी संख्या सातत्याने कमी होत असताना विद्यापीठाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.

चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील हुशार व अभ्यासू विद्यार्थ्यांचा कल गोंडवाना विद्यापीठाकडे नाही.उच्च शिक्षणासाठी हे सर्व विद्यार्थी जिल्ह्यांबाहेर पडत आहेत. मोठ्या कंपन्यांच्या मुलाखतीत किंवा ‘कॅम्पस’मध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीची दखल घेतली जात नाही, ही भावना बहुसंख्य पालक व विद्यार्थीवर्गात निर्माण झाली आहे. 

या मानसिकतेतून देखील दरवर्षी हजारो विद्यार्थी चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांतून बाहेर पडत आहेत. विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये कार्यरत प्राध्यापकांची मुलेदेखील नागपूर व इतर जिल्ह्यांतील विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी गळती रोखण्याचे आणि विद्यार्थी संख्या वाढवण्याचे आवाहन कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्यासमोर आहे.

चिंतेची बाब : -

विद्यार्थी संख्या इतक्या झपाट्याने कमी होणे, ही खरोखरच चिंतेची बाब आहे, असे सिनेट सदस्य प्रा.दिलीप चौधरी, प्रा.निलेश बेलखेडे यांनी सांगितले. चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांतील आर्थिकदृष्ट्या सुदृढ कुटुंबातील विद्यार्थी मुंबई व पुण्याचा मार्ग स्वीकारत आहेत, तर गरीब विद्यार्थी येथेच आहेत,असे चित्र पहावयास मिळत आहे.

विद्यार्थिनींचा " एसएनडीटी " कडे कल : -

चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावर मुलींसाठी एसएनडीटी विद्यापीठ सुरू झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षात या विद्यापीठात विद्यार्थिनींची संख्या बऱ्यापैकी आहे. वेगवेगळे अभ्यासक्रम असल्याने विद्यार्थिनींचा कल " एसएनडीटी " विद्यापीठाकडे आहे. परिणामी, गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थिनींची संख्या कमी होत आहे.

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची जिल्ह्यांबाहेर धाव : -

स्थानिक पातळीवर अनेक महाविद्यालयांत विद्यार्थी नियमित येत नसल्यामुळे वर्ग होत नाही, तर काही महाविद्यालयात विद्यार्थी नियमित आहेत, मात्र प्राध्यापक नियमित नाही, अशी स्थिती आहे. 

इंग्रजी कॉन्व्हेंट,सैनिकी शाळा येथील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांबाहेर जात आहेत.त्यामुळे गोंडवाना विद्यापीठात येणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !