सागवान वृक्षाच्या तोडी परवानगी नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या वनखात्यातील 2 अधिकारी निलंबित.
★
आदिवासींच्या जमिनीवर वृक्षतोड ; अवैधरित्या 27 ट्रक सागवानाचा पुरवठा झाल्याची माहिती समोर
एस.के.24 तास
नागपूर : सागवान वृक्षाच्या तोडीला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या वनखात्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनक्षेत्रातील या घटनेत आदिवासींच्या जमिनीवरील सागवान वृक्ष देखील तोडण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील पारशिवनी वनपरिक्षेत्रातील काही झाडे तोडण्याची परवानगी घेण्यात आली.ही झाडे तोडताना आदिवासींच्या जमिनीवरील अतिरिक्त झाडे देखील तोडण्यात आली.आदिवासींच्या जमिनीवरुन सुमारे १४५ झाडे तोडण्यात आल्याची चर्चा वनखात्यात आहे.
प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली हे अजूनही समोर आलेले नाही.या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीनंतर वृक्षतोडीची परवानगी देताना नियंत्रण राखण्यात अनियमितता आढळल्याने रामटेकचे सहाय्यक वनसंरक्षक राजेंद्र घाडगे आणि रामटेक व पारशिवनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (अतिरिक्त प्रभार) अनिल भगत यांना निलंबित करण्यात आले.