नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे कवंडे पासून केवळ 100 मीटर अंतरावरच स्फोटक साहित्यासह एक भरमार बंदूक जप्त.
★ माओवाद्यांचा मोठा घातपाताचा प्रयत्न पोलीसांनी उधळून लावला.
एस.के.24 तास
भामरागड : (दि.15/03/2025) गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून शासनविरोधी घातपाताच्या कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. या प्रकारचे साहित्य सुरक्षा दलांना हानी पोहचविण्याच्या उद्देशाने जंगल परिसरात जमिनीमध्ये पूरुन ठेवले जाते.
अशा पूरुन ठेवलेल्या साहित्याचा वापर माओवाद्यांकडून विविध नक्षल सप्ताहदरम्यान तसेच इतर प्रसंगी केला जातो.गडचिरोली पोलीस दलाने अशाच प्रकारचा माओवाद्यांचा घातपाताचा मोठा डाव उधळून लावला आहे.
दिनांक,15 मार्च 2025 रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोस्टे कवंडे येथे तैनात असलेल्या विशेष अभियान पथकाच्या जवानांना अभियानादरम्यान पोस्टे कवंडे पासून दक्षिणेला अंदाजे 100 मीटर अंतरावर असलेल्या पायवाटेवर झुडपांमध्ये लपवून ठेवलेली भरमार बंदूक मिळून आली होती. सदर बाबत वरिष्ठांना माहिती दिली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएस पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन बीडीडीएस पथकातील विविध अत्याधुनिक उपकरणांद्वारे सदर जंगल परिसरात शोध अभियान सुरु करण्यात आले होते. यावेळी भरमार बंदूक लपविलेल्या झुडपांशेजारी एक संशयित जागा मिळून आल्याने सदर घटनास्थळाची पाहणी केली.
असता, जमिनीमध्ये अंदाजे दिड ते दोन फुट खोलावर डेटोनेटरसाठी वापरण्यात येणाया लाल रंगाच्या वायरने बांधलेली प्लास्टीकची पिशवी मिळून आली. यावेळी मिळून आलेल्या पिशवीची बिडीडीएस पथकाकडून एक्सप्लोझीव्ह किटने तपासणी केली असता, त्यामध्ये स्फोटक पदार्थ असल्याची खात्री झाल्याने वरिष्ठंाच्या मार्गदर्शनाखाली सदर स्फोटक पदार्थ घटनास्थळावरच नष्ट करण्यात आले. तसेच सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. सत्यसाई कार्तिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी,भामरागड श्री.अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कवंडेचेे प्रभारी अधिकारी पोउपनि. मंदार शिंदे, विशेष अभियान पथक व बीडीडीएस पथकाच्या जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली.
पोलीस अधीक्षक श्री.नीलोत्पल यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे. तसेच सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांनी माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.