बांधकामाचे बिल काढण्यासाठी घेतली लाच,महिला सरपंचाला अटक.

बांधकामाचे बिल काढण्यासाठी घेतली लाच,महिला सरपंचाला अटक.


एस.के.24 तास


अमरावती : बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करणाऱ्या महिला सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्याच घरी लाच स्वीकारताना ताब्यात घेतले.या प्रकरणी खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोनू मुरलीधर सोळंके वय,30 वर्ष रा. सोनारखेडा असे गुन्हा दाखल झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे.त्या भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथे सरपंच म्हणून कार्यरत आहेत.या प्रकरणातील तक्रारकर्ते हे कंत्राटदार आहेत. त्यांनी सोनारखेडा गावात वेगवेगळी बांधकामे केली होती.त्यांच्या बांधकामाचे बिल देखील काढण्यात आले. 


त्याची रक्कम देखील त्यांना प्राप्त झाली. हे काम मिळवून देण्यासाठी मदत केल्याबद्दल बक्षीस म्हणून 41 हजार रुपयांची मागणी सोनू सोळंके यांनी कंत्राटदाराकडे केली होती. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे कंत्राटदाराने सांगितले.त्यावर काही रक्कम कमी करता येईल,असे सरपंच महिलेचे म्हणणे होते.


कंत्राटदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी केली, तेव्हा तडजोडीअंती 36 हजार रुपये स्वीकारण्याचे सरपंच महिलेने मान्य केले. 


सापळा कारवाईदरम्यान पंचांसमक्ष 36 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड याच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष तागड,योगेशकुमार दंदे, पोलीस हवालदार विनोद धुळे, पोलीस अंमलदार आशीष जांभोळे, महिला अंमलदार चित्रलेखा वानखडे, विद्या पाटील, चालक पोलीस हवालदार गोवर्धन नाईक यांनी पार पाडली.


दररोज कोठे ना कोठे लाच घेताना सरकारी अधिकारी, कर्मचारी पकडले जात आहेत. लाचखोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढत आहे. आता लोकप्रतिनिधी देखील कमिशनच्या नावाखाली लाच मागताना दिसून येत आहेत.त्यात महिलांचाही सहभाग वाढला आहे. शासकीय कार्यालयांमध्‍ये अधिकारी किंवा कर्मचारी यांच्‍यामार्फत नागरिकांची शासकीय कामे अडवून ठेवली जातात. 


अनेकवेळा लाचेची मागणी केली जाते." लाच स्‍वीकारणे हा गुन्‍हा आहे. " असे फलक कार्यालयांमध्‍ये लावण्‍यात आलेले असतानाही लाचखोरीचे प्रकार थांबत नाहीत.त्‍याला आळा घालण्‍यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्‍यात येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लावण्यात आलेले सापळे आणि पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्येही वृद्धी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !