महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव जत्रा संपूर्ण रात्रभर सुरू ठेवण्याची मागणी. - मा.खा.अशोकजी नेते यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.
एस.के.24 तास
गडचिरोली : दि.०४ फेब्रुवारी २०२५ गडचिरोली जिल्ह्यातील मौजा मार्कंडादेव देवस्थान, विदर्भाची काशी म्हणून ओळखली जाते, येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य जत्रेचे आयोजन केले जाते. या पवित्र स्थळी लाखो भाविक भक्तिभावाने येऊन रात्रभर भगवान महादेवांचे दर्शन आणि पवित्र स्नान करतात.
प्रशासनाच्या नियमानुसार रात्री १० वाजता जत्रा बंद करण्यात येते, यामुळे भाविकांची गैरसोय, तसेच लहान व्यावसायिक, दुकानदार आणि अस्थायी रोजगारधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक भाविकांना रात्रभर मंदिर परिसरात राहून दर्शन घेण्याची इच्छा असते, मात्र जत्रा लवकर बंद झाल्याने त्यांना मनःस्ताप होतो.
या पार्श्वभूमीवर, मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत जत्रा संपूर्ण रात्रभर सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.
★ भाविकांच्या श्रद्धेचा आणि व्यवसायिकांच्या हिताचा विचार गरजेचा : -
महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने अनेक गरजू, बेरोजगार नागरिकांना छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराची संधी मिळते. आठवडाभर चालणाऱ्या या जत्रेत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याने व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाला देखील मोठा फायदा होतो. मात्र, जत्रा बंद करण्याच्या प्रशासनाच्या नियमामुळे भाविक आणि व्यावसायिक दोघांनाही फटका बसतो.
नगरसेवक तथा सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे यांनी हा प्रश्न मा.खा. अशोकजी नेते यांच्यासमोर मांडला. भाविक भक्तांच्या आणि स्थानिक व्यावसायिकांच्या भावना लक्षात घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.या निवेदन प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, रवि मोहुरले, तसेच सोशल मीडिया प्रमुख दिवाकर गेडाम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाविक भक्तांची श्रद्धा आणि जत्रेचे महत्त्व लक्षात घेता, प्रशासनाने आवश्यक ती दखल घेऊन, जत्रा रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी संपूर्ण परिसरातील शिवभक्तांची आणि व्यावसायिकांची अपेक्षा आहे.महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी होणार असून, या निर्णयाची प्रतीक्षा सर्व भक्तगण करत आहेत.