गडचिरोली येथील गुरूदेव सेवाभावी पुरस्काराने दशमुखे दाम्पत्य होणार सन्मानित.
सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!
गडचिरोली : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा श्रीगुरुदेव ज्येष्ठ सेवाभावी दाम्पत्य पुरस्कार यावर्षी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सदस्य आणि पोर्ला येथील ज्येष्ठ प्रचारक तथा अखिल महाराष्ट्र भाट समाजाचे विदर्भ उपाध्यक्ष, तथा दैनिक गडचिरोली पत्रिकाचे संस्थापक संपादक केशवराव दशमुखे व सिंधुबाई दशमुखे या दाम्पत्याला जाहीर झाला आहे.
केशवराव दशमुखे यांनी गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले. त्यांच्या पुढाकाराने पोर्ला येथे गेल्या 20 वर्षांपासून कार्तिक पौर्णिमेनिमित्त शिव मंदिरात ग्रामगिता वाचन सप्ताह घेतला जातो.
या सप्ताहात वस्रदान,अन्नदान असे विविध उपक्रम घेतले जातात. तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक समस्या, शासन दरबारी मांडून त्या सोडविल्या. भाट समाजाच्या विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
येत्या दि.6 व 7 मार्च 2025 रोजी सांगडी, मंडल बेला, जि.आदिलाबाद येथे होणाऱ्या 19 व्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात दशमुखे दाम्पत्याला सेवाभावी दाम्पत्य या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, भाट समाजाचे पदाधिकारी आणि अनेक चाहत्यांकडून अभिनंदन करण्यात आले.