कोरची तालुक्यात वाघ -बिबट्याची शिकार करून कातडी व अवयवांची विक्री च्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश.

कोरची तालुक्यात वाघ -बिबट्याची शिकार करून कातडी व अवयवांची विक्री च्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश.


एस.के.24 तास


कोरची : वाघ-बिबट्याची शिकार करून त्यांची कातडी आणि इतर अवयवांची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील वनविभागाच्या चमुने केलेल्या कारवाईत कोरची तालुक्यातील काही लोक शिकार व तस्करीत गुंतल्याची माहिती समोर आली होती.


प्राप्त माहितीनुसार, सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ-बिबट्याच्या कातडीसह इतर काही अवयवांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती नागपूर येथील विभागीय वनाधिकारी (सतर्कता) पी.जी.कोडापे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गोंदिया वनविभागाला सतर्क केले.त्याच आधारे नकली ग्राहक पाठवून तीन आरोपींना 19 फेब्रुवारी ला अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडून वाघ आणि बिबट्याच्या मिशा, दोन दात, तसेच उदमांजराची कातडी आणि एक गावठी पिस्तुलही जप्त करण्यात आले होते. त्या आरोपींनी हे साहित्य मिळवण्यात कोरची तालुक्यातील आरोपींचा हात असल्याचे सांगितल्यानंतर सडक अर्जुनी च्या चमुने कोरची तालुक्यातील नकुल प्रल्हाद शहारे वय,58 वर्ष रा.कोहका आणि जितेंद्र गोविंदराव कराळे वय,30 वर्ष या दोघांना ताब्यात घेतले. 

यावेळी त्यांच्याकडून बिबट्याची कातडीही जप्त केल्याचे समजते. यानंतर त्यांना कोरची तालुक्यातील बेडगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची वनकोठडी दिली.


दरम्यान त्यांच्याकडून कोरची तालुक्यातील आणखी तिघांची नावे समोर आली. त्यापैकी इंदर रामदास सहारे रा.गहाणेघाटा आणि महेंद्र रामनाथ सहारे रा.कोहका यांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले.आणखी एका आरोपी चा शोध सुरू आहे.

रॅकेटचे हात कुठपर्यंत पसरले ?

वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक वरूण बी.आर.यांनी शनिवारी बेडगावला भेट देऊन प्रकरणाची सखोल माहिती घेतली. वाघ आणि बिबट्याची शिकार नेमकी कोणी, कुठे आणि केव्हा केली याची माहिती लवकरच समोर येईल. याशिवाय या तस्करीचे रॅकेट कुठपर्यंत पसरले आहे याचाही शोध लावण्याचे आव्हान वनविभागासमोर निर्माण झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !