धनगर समाजात घुसखोरी करणे " झाडे " ना भोवणार.

धनगर समाजात घुसखोरी करणे " झाडे " ना भोवणार.


एस.के.24 तास


गडचिरोली : महाराष्ट्र शासन निर्णयात नमुद केलेनुसार सदर भटक्या जमाती -क चे आरक्षण हे फक्त धनगर व त्यांच्या तत्सम जातीं करीतांच आहे, असे असतांना गडचिरोली व चंद्रपुर जिल्हातील " झाडे/झाडया " जातीचे लोक नामसदृश्याचा फायदा घेवून धनगर भटक्या जमाती-क चे आरक्षणाचा फायदा घेणे करीता भटक्या जमाती - क जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करीत असल्याचे आरोप धनगर जमात संघटना अधिकारी कर्मचारी संघटना आदींनी मागासवर्गीय आयोगाचे समीतीला निवेदन सादर करीत आपले म्हणणे मांडले.



यापूर्वी धनगर जमातीचे वतीने चंद्रपुर सह सर्व जातप्रमाणपत्र पडताळणी समीती व राज्य मागासवर्ग आयोगाकडे निवेदन सादर केले. त्यावर मागासवर्गीय आयोगाने दि.7.10.2024 ला नागपुरला सुनावणी घेतली त्यावेळी संघटनेने झाडे झाडया यांचे एकाच कुटुंबातील काही लोकांनी कुणबी- ओबीसी,काहीनी बेलदार-एनटी तर काहीनी झाडे भज-क असे जात प्रमाणपत्र काढल्याचे पुरावे आयोगाला सादर केले आहे.


तसेच एकाच व्यक्तीनी एकदा कुणबी- ओबीसी व नंतर झाडे भज-क असे जात प्रमाणपत्र काढल्याचे पुरावे आयोगाला सादर केले आहे व इतर कागदपत्रे सादर केली आहे.त्यात अनिल शिवराम बंडावार यांनी गडचिरोली समीती (नागपुर विभागीय समिती) कडुन 17.12.2009 ला भटक्या जमाती - क चे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले. 


सदर वैधता प्रमाणपत्र दक्षता पथकाचे अहवाल न घेता दिले गेले. तथापी त्यांचे पुतण्याचे जात वैधता प्रकरणाची तपासणी करतांना श्री बंडावार यांचे पुर्वजांचे महसुल रेकार्ड 1920-24 च्या नोंदी " कुणबी " / " झाडे कुणबी" आढळून आल्याने दि.23.10.2019 समीतीने त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र रह केले. 


समीतीला जात प्रमाणपत्र तपासणी कायदा 2000 नुसार दिलेल्या जात प्रमाणपत्राची फेरतपासणी करनेचे अधिकारक्षेत्र नाही या तांत्रीक कारणास्तव समीतीचा निर्णय मा.उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. रिस्टोर केलेल्या या जात वैधता प्रमाणपत्राचे आधारे त्यांचे गैर धनगर नातेवाईक भटक्या जमाती - क चे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त करीत आहेत.


धनगर व त्यांचे पोटजमातीचा समावेश शासनाने भटक्या जमाती-क मध्ये केला आहे. त्यामध्ये " झाडे - धनगर " ही सुध्दा धनगरांची एक पोट जमात आहे.विदर्भातील धनगर समाजात झाडे,व-हाडे, कानडे,तसेच खुटेकर,लाडसे या प्रमुख पोटजमाती असुन या शिवाय हटकर,कुरमार, धनवर,गडारीया या पोट जमाती विदर्भात राहतात. विदर्भातील धनगर समाजातील झाडे, व-हाडे, कानडे धनगरांचे स्वतंत्रापुर्वीचे कोणत्याही शासकिय नोंदी मध्ये पोटजमातीचा उल्लेख नाही.


जी नोंद आहे ती धनगर किवा धनकर. तसेच स्वतंत्र पोटजमात लिहणेची प्रथाही विदर्भातील धनगर समाजात नाही,विदर्भातील " झाडे - धनगर " मध्ये माहुरे,ढोले,ढाले,उरकुडे,खुजे,चतुर,घोडे, खराबे,बोधे,भोयर,कोठे, बुधे, चिव्हाणे, चामाटे, झाडे,निळ,गोरे,पचकटे,आस्कर, शेळके, चिडे,झिले,ननोरे, इत्यादी आडनांवे आहेत. 


यापैकी कुणाचेही बंडावार किंवा झाडे झाडया जातीतील इतरांशी रोटीबेटीचे व्यवहार नाही किंवा जमात विषयक व्यवहार नाहीत.पुर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपुर गडचिरोली, गोंदीया हा भाग पुर्वी पासुन झाडी पट्टट्टी म्हणुन ओळखला जातो. या परीसरात राहणारे बरेच जाती जमाती मध्ये झाडे ही पोटजमात / पोटजात आहे. उदा." झाडे-धनगर "," झाडे - कुनबी ", "झाडे - सुतार " त्यामुळे भटक्या जमाती - क मधील धनगर व त्यांचे पोटजमाती मधील " झाडे " शब्दाचा उपयोग गैरहेतुने घेवुन "झाडे-कुनबी" किवा इतर कोणत्या जातीचे लोक गैरमार्गाने भटक्य जमाती - क चे जात प्रमाणपत्र मिळवुन नोकरी मिळवत आहेत. 


गडचिरोली पोलीस भरती 2022,2023,2024 मध्ये भटक्या जमाती क प्रवर्गातुन गैरधनगर "झाडे" उमेदवाराची मोठ्या प्रमाणात निवड झाली आहे.


समाजकल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक सीबीसी-1584/71751/(2297)/बीसीडब्लू-5, दि.18 एप्रील 1986 मधील 8(1) व (2) अन्वये "विजा भज तथा इमावच्या यादीत मुख्य जमातीच्या ज्या पोटजाती, उपजाती किंवा तत्सम जाती दर्शविण्यात आलेल्या आहेत, त्या पोटजाती, उपजाती किंवा तत्सम जातीच्या व्यक्तींना पोटजातीच्या किंवा तत्सम जातीच्या नावाने जातीचे प्रमाणपत्र न देता, मुख्य जातीच्या नावाने प्रमाणपत्र द्यावे", असे स्पष्ट निर्देश जात प्रमाणपत्र देणारे व तपासणारे अधिकारांना शासनाने दिले आहे. 


तसेच निव्वळ पोटजाती/तत्सम जातीच्या नावे असल्यास अश्या व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देता येणार नाही कारण यावरुन मुख्य जात स्पष्ट होत नाही,असे नमुद करुन याबाबत शंका असल्यास संचालक, समाजकल्याण,पुणे यांचा सल्ला घ्यावा असे निर्देश दिले आहे.असे असतांना शासन आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. 


भटक्या जमाती च्या यादीत अनु क्रमांक 29 वर दिलेले आरक्षण हे फक्त धनगर व त्यांच्या तसत्म जमाती करतीच आहे, तसे शासन निर्णय दि 25.5.1990, दि 6.8.1992 मध्ये स्पष्ट नमुद केले आहे. सामाजीक न्याय विभागाचे शासन निर्णय दि 18.04.1986 व दि 1.11.2001 मध्ये पोट जातीच्या नावाने जात प्रमाणपत्र न देता त्यांचे मुख्य जातीशी संबंध असल्यास मुख्य जातीचे नावाने जात प्रमाणपत्र दयावे असे नमुद केले आहे. 


तसेच " एखादी जात मागासवर्गाच्या यादीत समाविष्ठ असलेल्या जातीची तसत्म जात आहे किंवा नाही हे ठरविणेचे अधिकार फक्त शासनास असुन सक्षम प्राधीकारी किंवा अपील प्राधाकरी हे स्वतःच्या अधीकारात तसे ठरवु शकत नाही, असे स्पष्ट शासनाचे आदेश आहेत. असे असतांनाही, या आदेशाकडे गडचिरोली व चंद्रपुर जिल्हातील महसुल प्रशासन दुर्लक्ष करुन "झाडे / झाडया" जातीचे लोकांना "झाडे / झाडया" नोंदीच्या आधारे भज-क चे जातप्रमाणपत्र देत आहे.


उप विभागीय अधीकारी व त्यांचे कार्यालयाचे चुकीमुळे गडचिरोली व चंद्रपुर जिल्हातील "झाडे / झाडया" जातीचे लोक नामसदृश्याचा फायदा घेवून धनगर भटक्या जमाती-क चे आरक्षण फायदा घेणेकरीता भटक्या जमाती-क जात प्रमाणपत्र मिळवीत आहेत व त्या आधारे शैक्षणीक व नोकरीत आरक्षण लाटत आहेत.


महोदय, त्यामुळे आयोगाला विनंती आहे कि, आयोगाने या प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेवुन, भटक्या जमाती - क चे यादीत क्रमांक 29(15) वर झाडे ऐवजी झाडे - धनगर अशी दुरुस्ती करने बाबत शासनाला शिफारस करावी व धनगर आरक्षणावरील गैर धनगरांचे अतीक्रमण थांबविण्यात यावे.


मागण्या :  - 


1) भटक्या जमाती-क चे यादीत क्रमांक 29 (15) वर झाडे ऐवजी झाडे-धनगर अशी दुरुस्ती करने बाबत शासनाला शिफारस करावी.


2) "झाडे/ झाडया" जातीचे लोकांना नामसदृश्याचा फायदा देवून धनगर भटक्या जमाती-क जातप्रमाणपत्र देण्यात येवु नये करीता जिल्हा महसुल प्रशासनाला आदेशीत करावे.


3) आता पर्यत दिलेले सर्व जात प्रमाणपत्र रदद करावे, जप्त करावे.


4) जात पडताळणी समीतीने श्री बंडावार व इतर प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावी.


5) झाडे/ झाडया" जातीचे ज्या कर्मचारांनी धनगर भटक्या जमाती-क जातप्रमाणपत्र आधारे नोकरी मिळवली आहे त्यांचेवर मा. सर्वोच्च न्यायालयाचे बहीरा प्रकरणातील निकालानुसार कार्यवाही करावी.


अशी मागणी आयोगाला यावेळी करण्यात आली. आयोगाच्या या बैठकिस डाॅ.मंगेश गुलवाडे, डॉ तुषार मर्लावार,संजय कन्नावार,हेमंत ढोले,डॉ.नारायण करेवार, सोमेश कंचावार,अशोक काळेवार,भारत उईनवार ,राजाराम उईनवार, सुरेश डंकरवार,सुधाकर घोरपडे,मयूर भोकरे,प्रविण गिलबिले,पवन ढवळे आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !