चंद्रपूर मध्ये भाजपाचे 5 ही आमदार पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत एकाच मंचावर.
एस.के.24 तास
चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३६ दिवसात तीन वेळा या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले.प्रत्येक दौऱ्याप्रसंगी एखाद आमदाराची कार्यक्रमाला अनुपस्थिती असायची. त्यामुळे माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकायच्या.
आजच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील 5 ही आमदार तसेच पालकमंत्री व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष असे भाजपाचे सर्वच नेते मंडळी एकाच मंचावर एकत्र आल्याने आजचा दिवस ‘व्हॅलनटाईन डे’ ठरला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर १० जानेवारी ते १६ फेब्रुवारी या ३६ दिवसात मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा 3 वेळा दौरा केला. १० जानेवारी रोजी माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी कार्यक्रमाला फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार,ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर उपस्थित होते.
माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य आमदार गैरहजर होते. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी महारोगी सेवा समिती व आनंदवनच्या स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शविली. त्या कार्यक्रमाला पालकमंत्री अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, अमादार करण देवतळे यांनी उपस्थिती दर्शविली.
माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे इतर आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत. एका मंचावर येत नाही. मुख्यमंत्री दोन वेळा जिल्ह्यात आल्यानंतरही मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवली अशा आशयाच्या बातम्या माध्यमात झळकल्या. मात्र सन्मित्र नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपाचे पाचही आमदार अनुक्रमे आ. कीर्तीकुमार भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे तसेच पालकमंत्री डॉ.प्रा.अशोक उईके असे सारेच एकत्र आले.
राज्यातील सत्तास्थापनेनंतर जिल्हा भाजपात मोठ्या प्रमाणात दुफळी दिसून येत होते. पालकमंत्री अशोक उईके यांच्या प्रथम आगमनात तसेच मुख्यमंत्र्यांच्या ही प्रथम आगमन प्रसंगी ती दिसून आली होती. मात्र आता ३६ व्या दिवशी ३६ आकड्याने काडीमोड घेतला असून भाजपाचे सर्वच आमदार मुख्यमंत्र्यांसोबत कार्यक्रमाला उपस्थित झाल्याने सर्वकाही आलबेल आहे असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी दिला.
माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोरवा विमानतळावर समर्थकांसह स्वागत केले. तसेच संपूर्ण कार्यक्रमालाही अन्य आमदारांसह उपस्थिती दर्शविली. त्यामुळे आज येथे खऱ्या अर्थाने व्हॅलेनटाईन डे चे चित्र बघायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांसोबत मुनगंटीवार यांनी मनमोकळा संवाद साधला.केवळ मुख्यमंत्रीच नाही तर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व मुनगंटीवार एकाच सोफ्यावर आजूबाजूला बसले होते आणि गप्पाही करित होते.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्री फडणवीस १० जानेवारी व १६ फेब्रुवारी या दोन कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपुरात आले.श्रीमती फडणवीस यांनीही या निमित्ताने स्वत:ची सक्रीयता दाखवून दिली.