सावली तालुक्यातील लोंढोली येथे 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केली अटक.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील लोंढोली येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाल्याने रक्कम देयके काढण्यासाठी प्रमाणपत्राकरीता 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चंद्रशेखर रामटेके या ग्रामसेवकास अटक केली.
सावली तालुक्यातील लोंढोली येथील रहिवासी यांच्या वडिलांचे नावाने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले, या योजनेतील सर्व प्रशासकीय कामे मौजा लोंढोली ग्रामपंचायत चे ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके हे हाताळीत होते.
दरम्यान पहिला हप्ता व दुसऱ्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली परंतु तिसऱ्या हप्त्याचे देयकासाठी प्रमाणपत्रकरिता ग्रामसेवक रामटेके यांनी 20,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची तयारी नसल्यामुळे त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राप्त तक्रारीवरून दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सापळा रचला दरम्यान ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांनी तडजोडीअंती पहिले 10,000 व नंतर 10,000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यावरून सापळ्या दरम्यान तक्रारदाराकडून ग्रामसेवक चंद्रशेखर रामटेके यांनी 10,000 रुपयांची लाच स्वीकारली. ग्रामसेवक रामटेके विरुद्ध पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा करून अटक करण्यात आली आहे.