जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर च्या परीक्षार्थ्यांना ऑनलाइन उत्तरपत्रिका मिळताच जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अस्वस्थ.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक व शिपाई पदासाठीच्या ऑनलाइन परीक्षेतील गोंधळ, परीक्षा रद्द करावी,या मागणीसाठी सुरू असलेले साखळी उपोषण,माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाची दखल घेत परीक्षा रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे दिलेले आश्वासन, यामुळे बँकेची परीक्षा रद्द होते की काय, याकडे परीक्षार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
अशातच सोमवारी परीक्षार्थ्यांच्या ‘आयडी’वर उत्तरपत्रिका आली. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कमी गुण दिसत असल्याने बँकेच्या संचालक मंडळात अस्वस्थता पसरली आहे.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ लिपिक व शिपाई पदासाठीची परीक्षा २१,२२ व २३ डिसेंबर रोजी झाली.
शिपाई पदाच्या ९७ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा सुरू होताच तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर २९ डिसेंबर रोजी परीक्षा घेतली गेली.
नागपुरात रायसोनी परीक्षा केंद्रावर पुन्हा तांत्रिक बिघाड उद्भवला. त्यामुळे आता परीक्षार्थ्यांनीच ही परीक्षा रद्द करावी,अशी मागणी लावून धरली आहे. आरक्षण बचाव कृती समिती व इतर संघटनांनी जिल्हा बँकेसमोर परीक्षा रद्द करावी, या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण मंडपाला तत्कालीन पालकमंत्री मुनगंटीवार, आमदार जोरगेवार यांनी भेट देत परीक्षा रद्द करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.