बल्लारशा - गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही - आलेवाही जवळ एका वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू.
एस.के.24 तास
सिंदेवाही : बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रक्सौल एक्स्प्रेसने सिंदेवाही - आलेवाही जवळ एका वाघाला धडक दिल्याने वाघाचा जागीच मृत्यू झाला आहे. बल्लारशा- गोंदिया रेल्वे मार्ग वाघासाठी कर्दनकाळ ठरत आहे. बल्लारशा-गोंदिया मार्गांवर मेमू गाड्यसह अन्य रेल्वे गाड्या धावतात. रविवारी सकाळी रक्सौल एक्स्प्रेसच्या धडकेत वाघ मृत झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग व रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासनिसाठी पाठविण्यात आला आहे. यापूर्वी या रेल्वे मार्गांवर वाघीनीचा बछडा मृतावस्थेत आढळून आला होता हे विशेष.
दरम्यान चंद्रपूर - बल्लारपूर रेल्वे मार्गावर आजवर ५० पेक्षा अधिक वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वाघ, बिबट्या, हरण, चितळ, अस्वल, रानगवा यासोबतच इतरही प्राण्यांचा समावेश आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे , बिलासपुर झोन अंतर्गत गोंदिया- नागभीड- चांदाफोर्ट – बल्लारशाह हा रेल्वे मार्ग जास्तीत जास्त जंगलव्यात भागातून आहे.
नागभीड - चांदाफोर्ट रेल्वे मार्ग घनदाट जंगलातून असुन ताडोबा - अंधेरी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प व घोडाझरी अभयारण्य लागूनच आहे. या रेल्वे मार्गांवर अनेक ठिकाणी वाघ, बिबट्या, हरिण, रानगवे, अस्वल यासारख्या वन्यप्राणी अपघातात मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या मार्गावरील वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीचे मार्ग शोधून काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.
व त्यानुसार काही ठिकाणी अंडरपास व बाजूला तार फेन्सिंग करण्यात यावे असे सुचविले गेले असल्याची माहिती आहे. मात्र रेल्वे प्रशासन व वनविभाग यांच्या योग्य समन्वया अभावी या उपाययोजना संदर्भात अद्याप कोणताही तोडगा किंवा निर्णय होऊ शकलेला नसल्याची चर्चा आहे. सोबतच या मार्गावरील अपेक्षित दुहेरीकरण रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी आडकाठी आली आहे.
भविष्यात नागपुर - नागभीड ब्रॅाडगेज रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर बल्लारपुर मार्गासाठी या लाईन चा पर्यायी मार्ग म्हणून वापर होणार आहे. राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. एकीकडे विकासाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे वनविभाग व रेल्वे प्रशासनाने समन्वयाने यातुन सकारात्मक मार्ग काढून निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. - संजय गजपुरे, सदस्य,दपुम रेल्वे बिलासपुर झोन