मृत वाघाचे सुळे दात व पंजाची १२ नखे वेकोलि च्या कर्मचाऱ्यांनी चोरले मृत वाघाचे अवयव ; उकणी खाणीतील घटना आरोपींना अटक.

मृत वाघाचे सुळे दात व पंजाची १२ नखे वेकोलि च्या कर्मचाऱ्यांनी चोरले मृत वाघाचे अवयव ; उकणी खाणीतील घटना आरोपींना अटक.


एस.के.24 तास


वणी : वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत विजेच्या धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. मृत वाघाचे सुळे दात व पंजाची १२ नखे लंपास करण्यात आली होती. त्यामुळे या वाघाची हत्या की आकस्मिक मृत्यू अशी चर्चा होती.


 मात्र वाघाच्या मृत्यूनंतर निलजई कोळसा खाणीत काम करणाऱ्या वेकोलीच्या कर्मचाऱ्यांनी या वाघाचे दात व नखे लंपास केल्याचे तपासात उघड झाले. वन विभागाने या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले.

नागेश विठ्ठल हिरादेवे वय,४० रोशन सुभाष देरकर वय,२८, दोघेही रा.उकणी व सतीश अशोक मांढरे वय,२६, आकाश नागेश धानोरकर वय,२७, दोघेही रा.वणी यांना गुरूवारी मध्यरात्री अटक केली.

 हे चारही आरोपी वणी तालुक्यातील निलजई कोळसा खाणीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. या आरोपींकडून चार दात व काही नखे जप्त करण्यात आली. या कारवाईने वेकोली कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

उकणी कोळसा खाणीतील मुख्य रस्त्यावर ७ जानेवारी रोजी मृत वाघाचा सांगाडा आढळून आला होता. ही माहिती मिळताच, वणी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत वाघाचे शवविच्छेदन केले. अंदाजे तीन ते चार वर्षे वय असलेल्या या वाघाचा मृत्यू घटना उघडकीस येण्याच्या १२ ते १३ दिवसांपूर्वी झाल्याचे शव विच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. 

घटनास्थळी बोअरवेलसाठी असलेल्या रोहित्राच्या विजेचा धक्का लागून वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. पंचनाम्याच्या वेळी वाघाचे दात आणि नखे गायब असल्याचेही स्पष्ट झाले होते. ते कोणी लंपास केले, याचा शोध वन अधिकाऱ्यांनी सुरू केला. 

तेव्हा हे अवयव वेकोलीच्या कर्मचाऱ्यांनी लंपास केल्याची टीप तपासादरम्यान वनअधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून खात्री करत वनअधिकाऱ्यांनी संशयित चारही आरोपींना अटक केली. या प्रकरणात अटक केलेले आरोपी आकाश धानोरकर व सतीश मांढरे यांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन दिला, तर नागेश हिरादेवे व रोशन देरकर या दोघांना वनकोठडी सुनावली. 

ही कारवाई एसीएफ संगीता कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ आशिष देशमुख, क्षेत्र सहायक एस. आर. राजूरकर, वनरक्षक एस. ए. वाघ यांच्यासह वनविभागाच्या पथकाने केली. मृत वाघाचे अवयव चोरल्याच्या घटनेचा उलगडा झाला. मात्र या वाघाच्या मृत्यूसाठी नेमके कोण जबाबदार आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

वन अधिकाऱ्यांनी सुनावणीनंतर आरोपींना न्यायालयातून वनविभागाच्या कार्यालयात आणले तेव्हा आरोपी नागेश हिरादेवे याने गळ्यातील दुपट्ट्याने स्वत:चा गळा आवळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ वणीच्या ग्रामीण रुग्णालयात व तेथून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी या घटनेने वन वुर्तळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !