पत्रकारांना लेखनीसारखी सखी नाही पत्रकार दिन कार्यक्रम. - डॉ.धनराज खानोरकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : ०६/०१/२५ " आचार्य बाळशास्त्री जांभेकररांनी ०६ जानेवारी १८३२ ला ' दर्पण ' वृत्तपत्र काढून समाजाची स्पंदने टिपली.स्थानिकांच्या समस्या, प्रश्न इंग्रजांना समजावे म्हणून एक काॅलम इंग्रजीचा ठेवला. महाराष्ट्राला पत्रकारितेचा फार मोठा इतिहास लाभला आहे. लोकहितवादी,माडखोलकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आचार्य अत्रे,फडकेंनी आपल्या लेखनीने हे क्षेत्र गाजविले,हे आपले आदर्श आहेत.
आजची पत्रकारिता वेगवेगळ्या वळणावर जाते आहे,तरीपण प्रिन्ट मिडियाचा वाचक काही कमी नाही,लेखनीसारखी पत्रकारांची सखी नाही " असे काव्यमय विधान डॉ धनराज खानोरकरांनी केले.ते ब्रह्मपुरी येथील अर्धसाप्ताहिक ब्रह्मपुरी समाचार कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त बोलत होते.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके उपस्थित होते. तर तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रा. विजय मुळे,दिलिप शिनखेडे,नेताजी मेश्राम,दीपक पत्रे,महेश पिलारे,नंदू गुड्डेवार, अमरदीप लोखंडे उपस्थित होते.यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन सर्वांनीच पुष्प वाहून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमाचे संचालन महेश पिलारे तर आभार तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकरांनी केले. यशस्वीतेसाठी अर्धसाप्ताहिक ब्रह्मपुरी समाचार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.