चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची दुचाकीला कट मारला या शुल्लक कारणावरून दगडाने ठेचून निर्घृण हत्या.
एस.के.24 तास
चंद्रपूर : शहरातील बाबुपेठ परिसरात तन्मय जावेद शेख या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची दुचाकीला कट मारला या शुल्लक कारणावरून दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी एका पोलीस शिपायाच्या मुलासह 3 आरोपींना अटक केली आहे तर एक आरोपी अद्याप पसार आहे.
मृत तन्मय हा बाबुपेठ येथील रहिवासी होता. सूत्राच्या माहितीनुसार तन्मय शेख हा रात्री नऊ वाजताच्या सुमारास घराकडे जात होता. त्याच वेळी काही तरुण तिथूनच जात होते. रस्त्यात काहींच्या दुचाकी वाहनाला तन्मयच्या वाहनाचा कट लागल्याने चार अल्पवयीन मुलांनी तन्मयला कट का मारली म्हणून जबर मारहाण केली.
त्यानंतर त्याला बाबूपेठ रेल्वे फाटकजवळील रेल्वे पटरीजवळ नेण्यात आले. तिथेही त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर दगडाने ठेचून त्याची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
आरोपीनी अत्यंत क्रूरतेने तन्मयची हत्या केली असून त्याचा चेहराही ओळखणे कठीण झाले आहे. शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू आहे. एका पोलीस शिपायचा मुलगाही या हत्या प्रकरणात आरोपी आहे.
मागील काही दिवसांत जिल्ह्यात हत्यांचे सत्र वाढले आहे. सातत्याने हत्या होत असून देशी कट्टे, तलवारी व इतर शस्त्र मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाले आहे.