बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने लाच घेताना रंगेहात अटक.
एस.के.24 तास
बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एका वाहतूकदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
या कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शाह यांनी ३ लाख ८० हजाराची लाच मागितली होती. तेंदूपत्ता वाहतूक करणाऱ्या एका वाहतूकदाराच्या तक्रारीवरून एसीबीने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून ते व्यवसायाने तेंदूपत्ता वाहतूक करतात. ऑगस्ट महिन्यात या वाहतूकदाराने गडचिरोली येथील एका तेंदूपत्ता व्यापाऱ्याचा माल बल्लारपूर येथील बामणी येथे आणला होता, हा सौदा १९ लाख रुपयांना ठरला होता.
परंतु सदर व्यापारी मालाची किंमत व वाहतूक देण्यास टाळाटाळ करीत असल्याने वाहतूकदाराने संबंधित व्यावसायिकाविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी बल्लारपूरचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी फिर्यादीकडे व्यावसायिकाकडे अडकलेली रक्कम वसूल करण्याच्या बदल्यात ३ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारीनंतर तेंदूपत्ता व्यापारी आणि वाहतूकदार यांच्यात १६ लाख २५ हजार रुपये किमतीत समझोता झाला असून, व्यापाऱ्याने ही रक्कम वाहतूकदाराला दिली होती. पैसे मिळाल्यानंतर वाहतूकदाराने या व्यावसायिकाविरुद्ध बल्लारपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याचे आवाहन केले.
पोलिस उपनिरीक्षक हुसेन शाह तक्रार मागे घेण्यास तयार नव्हते, त्याबदल्यात पीएसआय शहा यांनी वाहतूकदाराकडे पैशांची मागणी केली मागणी शेवटी वाहतूकदाराने पीएसआयशी ५० हजार रुपये देण्याचे करार केले आणि याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने सापळा रचून वाहतूकदाराकडून ५० हजारांची रक्कम स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक हुसेन शाह याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले व पथकाने केली.