वाघाचे 3 तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज ?
एस.के.24 तास
भंडारा : तुमसर तालुक्यातील तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झंजेरिया गावाजवळील घनदाट जंगलात एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला, विशेष म्हणजे त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून मृत वाघाचे तुकडे करून जंगलात कुणी फेकले, या दिशेने शोध सुरू झाला आहे.
ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे, मृतावस्थेत आढळलेला वाघ तीन तुकड्यात दिसून आला. पंधरा दिवसातील वाघ मृत आढळल्याची दुसरी घटना आहे. ही शिकार की वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.
तुमसर वन परिक्षेत्रात मागील काही दिवसांपूर्वी वाघाचे दर्शन झाल्याने येथील भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विदर्भातील जंगल परसरात गेल्या १० दिवसांत दोन वाघांची शिकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
८ दिवसांपूर्वी तुमसर येथे एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आज सकाळी एका वाघाचे दोन तुकडे करुन त्याची शिकार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
विजेच्या प्रवाहाने या वाघाची शिकार करून दोन तुकडे केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या वनाधिकारी घटनास्थळावर पोहचले असून उत्तरीय तपासणीनंतर वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं.
या अगोदर ८ दिवसांपूर्वी तुमसर वन विभागाच्या लेंडेझरी परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला होता, त्यानंतर ८ दिवसांतच आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, वन विभागतही अलर्ट मोडवर आहे.