अधिकृत धान खरेदी केंद्रांवर रोष. ★ क्विंटल मागे शेतकऱ्यांना १००० चा फटका ? रोखठोक : - प्रा.महेश पानसे.

अधिकृत धान खरेदी केंद्रांवर रोष.

क्विंटल मागे शेतकऱ्यांना १००० चा फटका ?

                 

रोखठोक : - प्रा.महेश पानसे.


चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांना धान विक्री करताना अडचणी येऊ नयेत.हमी भावाची हमी नसली तरी अधिकृत धान विक्री केंद्रांवर आर्थिक व्यवहाराची हमी व पुढे मागे शासन घोषीत बोनस ची आस धरून शेतकरी मोठ्या संख्येने या अधिकृत धान विक्री केंद्रांवर ( फेडरेशन)गर्दी करू लागले आहेत. मात्र इथेही धान उत्पादक शेतकऱ्यांना कात्री लावण्याचा प्रकार सर्रास सुरू झाल्याची मोठी ओरड सुरू झाल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. यंदा भाव धासळल्याने वैतागलेला धान उत्पादक शेतकऱी धान खरेदी केंद्रांवर सुरू झालेल्या भुरट्या चोरीने संतापला आहे.


चंद्रपूर जिल्ह्या धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. निसर्गाचा लहरीपणा, व्यापाऱ्यांची बनियागिरी , आर्थिक फसवणूक यातून काही अंशी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरीता शासनाने अधिकृत धान खरेदी केंद्र सुरू केलेत.या केंद्रांवर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने घोषीत केलेला बोनस मिळण्याची संधी सुद्धा असते. जिल्ह्यात खास करुन धान उत्पादन क्षेत्रात अनेक केंद्रांवर शेतकरी आपले धान्य विक्री करीता गर्दी करताना दिसतात.


विशेष म्हणजे यंदा धान्याचा भाव रूपये २३०० चे वर सरकताना दिसत नाही, गतवर्षी हा भाव रुपये ३१०० पर्यंत सरकला होता. यंदा हंगामामध्ये पावसाने बेभान झोपल्याने दुहेरी पेरणीमूळे धान उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे आढळले आहे. 


अशा स्थितीत जर धान उत्पादक शेतकऱ्यांना अधिकृत खरेदी केंद्रांवर (फेडरेशन) गंडविले जात असेल तर मात्र शेतकरी भडकला तर नवल नसावे.नुकतीच धानाचे चुरणे आटोपले व शेतकऱ्यांची मोठी ओघ या खरेदी केंद्रांवर सुरू झाली. या केंद्रांवर क्विंटल मागे ३ किलो धान कपात करून वजन केले जात असल्याचा पहिला झटका शेतकऱ्यांना बसला आहे.अनेक

 

अधिकृत धान खरेदी केंद्रांवर ही सुरू झालेली परंपरा भुरट्या चोरी मध्ये मोडत असल्याची शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली आहे.धान अजून सुकले नसल्याने ही कपात करण्यात येत असल्याचे या केंद्रांवर सांगण्यात येते.१० क्विंटल मागे धान उत्पादकांना सरसकट ६०० ते ६५० रुपयांचा फटका बसू लागला आहे.व्यापारी सुद्धा क्विंटल मागे फक्त किलोभर धान कपात करतात हे विशेष.

            

दुसरा झटका शेतकऱ्यांना मिळत आहे तो गोणींमध्ये (पोती).१ गोणी २२ रुपयांत दुकानातून विकत ध्यावी लागते. धानाचा काटा केल्यानंतर ही गोणी शेतकऱ्यांना परत मिळत नाही.१० क्विंटल मागे अंदाजे २५० रूपयांचा फटका धान उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याची ओरड सुरू झाली आहे. व्यापारी शेतकऱ्यांना गोणी स्वता पुरवितात हे विशेष. 


सरसकट अंदाजे ९०० ते १००० रूपयांचा फटका अधिकृत धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना बसत असल्याचे बोलले जाते.गत वर्षीच्या तुलनेत यंदा धानाचे भाव क्विंटल मागे ८०० ते १००० रूपयांनी पडले आहेत.वरून धान खरेदी केंद्रांवर क्विंटल मागे ९०० ते १००० चा फटका शेतकऱ्यांना संताप आणणारा असल्याचे बोलले जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !