पतंगाचा दोर आयुष्याला घोर ; विजेच्या धक्क्याने एका बालकाचा मृत्यू.
एस.के.24 तास
यवतमाळ : आर्णी येथे घराच्या छतावर पंतग उडविताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू झाला.अन्य एका घटनेत बाभूळगाव तालुक्यात तारेच्या कुंपणात सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
रितेश संजय सुरजुसे वय,13 वर्ष रा.गांधीनगर आर्णी व बाबाराव मारोती कुमरे वय,55 वर्ष रा.खडकसावंगा,बाभूळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
आर्णीतील गांधीनगर येथील रितेश हा रविवारी घराच्या छतावर पंतग उडवित होता.खांबावरून घरात वीजप्रवाह सोडलेल्या केबलच्या कापलेल्या भागास रितेशचा स्पर्श झाला. ला विजेचा जोरदार झटका बसला.जखमी अवस्थेत दवाखान्यात नेताना त्याचा मृत्यू झाला.
रितेशला वडील नसून, मोठा भाऊ गतिमंद आहे. आई त्यांचा सांभाळ करते.रितेशच्या मृत्यूने रोजमजुरी करणाऱ्या सूरजुसे परिवारावर संकट ओढवले आहे.मागील 15 दिवसांत मांजामुळे गळा कापल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले होते. आता पतंग उडविताना विजेचा धक्का लागल्याने बालकाचा मृत्यू झाल्याने पतंगीचा खेळ आयुष्याची दोरी कापत असल्याची चर्चा आहे.
दुसऱ्या घटनेत बाभूळगाव तालुक्यातील खडकसावंगा येथील शेतकरी बाबाराव कुमरे हे प्रतापपूर शिवारात गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.रविवारी बाबाराव पिटकर यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला.
वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुंपणाच्या तारांमध्ये वीज प्रवाह सोडण्यात आला होता. त्यातील विजेच्या धक्क्याने बाबाराव यांचा मृत्यू झाल्याची तक्रार अरविंद कुमरे यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात दिली.