फाईल फोटो |
विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या.
एस.के.24 तास !!
राहुल सोमनकार !! तालुका प्रतिनिधी पोंभूर्णा
पोंभूर्णा : दारूचे व्यसन व हाताला काम नसल्यामुळे मानसीक नैराश्यातून देवाडा खुर्द येथील इसमाने विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या उद्धव घोंगडे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.
प्रफुल बेंडुजी सातरे वय (३२) वर्ष रा.देवाडा खुर्द असे आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव आहे.सदर घटना २० डिसेंबर ला सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मृतक प्रफुल सातरे देवाडा खुर्द येथील रहिवासी असून तो मजुरीचे काम करायचा.तो दारुच्या आहारी गेला होता.घरच्यांशी तो वाद घालत असायचा.त्यामुळे पत्नीही आठ दिवसांपूर्वी आपल्या दोन मुलांना घेऊन माहेरी गेली होती.हाताला कोणतेही काम नसल्याने व दारुचे व्यसनाची लत लागले असल्याने तो दोन दिवसापासून वेड्यासारखा वागत होता.
दि.१९ डिसेंबरला तो मध्यरात्री बाहेर निघून गेला होता.घरच्या मंडळींनी त्याची शोध शोध केली मात्र त्याचा पत्ता लागला नाही.दि.२० डिसेंबरला सकाळी 7:00 वाजता च्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या उद्धव घोंगडे यांच्या शेतातील विहिरीत प्रफुल सातरे यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
मृतकाने विहीरीजवळ स्वेटर व दुप्पटा काढून ठेवला होता. सदर घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना मिळताच विहीरीत गळ टाकून शव बाहेर काढण्यात आले.पोलिसांनी पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात येथे शवविच्छेदन करण्यात आले.पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.