आधारभूत धान खरेदी नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी.
★ माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांना घेऊन तहसीलदार सावली यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून मागणी.
एस.के.24 तास
सावली : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान उत्पादक शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती मात्र शेतकऱ्यांची संख्या जास्त असतांना नोंदणी केंद्राची संख्या कमी,लिंक फेलची अडचण यामुळे अजूनही अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात तहसीलदार सावली यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले.
शासनाने रब्बी हंगामातील धान खरेदी नोंदणीसाठी नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. परंतु खरेदी केंद्राने नोंदणीवर बहिष्कार टाकल्याने नोव्हेंबर महिन्यात एकही नोंदणी झाली नाही. डिसेंबर मध्ये ऑनलाईन नोंदणीला सुरवात झाली मात्र कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे शासनाने 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी मुदत वाढवली.
नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने 4 ते 5 दिवस रांगेत राहिल्यावर नोंदणी होत असे.त्यातच लिंक फेलची अडचण येऊ लागली.त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नोंदणीपासून वंचित आहेत. शेतकरी बोनस पासून वंचित राहू नये म्हणून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी माजी सभापती विजय कोरेवार यांनी शेकडो शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे कडे निवेदनातून केली आहे.