ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव (बु.) परीसरात दोन ट्रॅक्टर सह १३० ब्रास अवैध रेती साठा जप्त.
★ महसुल विभागाची मोठी कारवाई,जंगलव्याप्त भागात रेतीची साठवणूक.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,२/१२/२०२४ ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगांव (बु.) परिसरातील वनविभागाच्या जागेवर रेती तस्करांनी अवैधरित्या रेतीची साठवणूक केली होती. याबाबतची माहिती महसूल प्रशासनला मिळताच दि . १ डिसेंबर ला अवैध रेती साठ्यावर धडक कारवाई करीत रेती साठा करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरसह १३० ब्रास रेतीसाठा जप्त केला. या कारवाईने तालुक्यातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यामुळे या रेतीची मागणी अधिक असते. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्याने अनेक रेतीतस्कर सक्रीय झाले होते. परंतु. निवडणुक प्रक्रियेच्या कामात महसूल विभागाचे अधिकारी गुंतले असताना दरम्यानच्या काळात रेती तस्करांनी रेती साठा साठवून ठेवला.
निवडणुकीपूर्वी महसूल प्रशासन अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने रेती तस्करीवर काही प्रमाणात अंकूश लागले होते. मात्र निवडणुकीच्या कामात महसूल विभाग गुंतला असल्याचे पाहून रेती तस्करांनी डोके वर काढत रेती साठा साठवला असल्याची माहिती महसूल विभागाला मिळताच प्रांत अधिकारी पर्वणी पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसिलदार सतिश मासाळ यांच्या नेतुत्वात नायब तहसिलदार आशिष तालेवार, ग्राम महसूल अधिकारी हिमांशू पाजनकर, घनश्याम राऊत, भूपेंद्र गौरे, स्वपिल इसड यांनी
ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव परिसरात वनविभागाच्या जंगल व्याप्त जागेत अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावर धडक कारवाई करत १३० ब्रास अवैध रेती साठा जप्त केला. घटनास्थळावर रेती साठवणूक करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरमध्ये अवैध रित्या रेती आढळून आल्याने ट्रॅक्टर जप्त करून दंडात्मक कारवाई करिता तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
महसूल विभागातर्फे अवैध रेती साठा, अवैध वाहतूक, अवैध उत्खनन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई होत असल्याने महसूल विभागाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. महसूल विभागाच्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.