आमश्या पाडवी यांनी आमदारीकी ची शपथ घेताना एकही शब्द व्यवस्थित वाचता आला नाही.
★ त्यांचा हा शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही तुफान व्हायरल
एस.के.24 तास
मुबंई : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ७ तारखेपासून राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडत आहे.
आज शिवेसनेचे (शिंदे) आमदार आमश्या पाडवी यांनी आमदारीकीची शपथ घेतली.आमदारीकीची शपथ घेतल्यानंतर आमश्या पाडवी हे चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण आमदारीकीची शपथ घेताना त्यांना शपथविधीतील एकही शब्द व्यवस्थित वाचता आला नाही. त्यांचा हा शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
यानंतर आमश्या पाडवी यांनी आमदारकीची शपथ घेताना गोंधळ का झाला? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘शपथ घेताना वाक्य जास्त लांब (मोठं वाक्य) असल्यामुळे अडचण आली’, असं कारण आमश्या पाडवी यांनी साम टिव्ही या वृत्तवाहीनीशी प्रतिक्रिया देताना सागितलं आहे.
आमश्या पाडवी काय म्हणाले ?
“ आज आमदारकीची शपथ घेतली आनंद आहे. मी परिवारासह शपथविधीसाठी आलो होतो. जेव्हा मी पहिल्यांदा विधानपरिषदेत शपथ घेतली होती.
तेव्हा माझ्याबरोबर परिवार आलेला नव्हता. माझी इच्छा होती की मी विधानपरिषदेचा सदस्य असताना मी विधानसभेच्या निवडणुकीत निवडून यायला पाहिजे आणि निवडून देखील आलो. आज आमदारकीची शपथ घेताना सर्व परिवार बरोबर आहे याचा आनंद आहे”, असं आमश्या पाडवी यांनी म्हटलं.
शपथ घेताना गोंधळ का झाला ?
“ माझं शिक्षण कमी आहे,त्यामुळे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोलत होते.त्यानंतर मी बोलत होतो. त्यांनी वाक्य जास्त लांब (मोठं वाक्य) वाचलं. त्यामुळे अडचण आली. कारण माझ्या संपूर्ण परिवारामध्ये चौथी पर्यंत शिकणारा मी पहिला व्यक्ती आहे.
तरीही मी सरपंच झालो,पंचायत समीतीचा सभापती झालो आणि दोन वेळा आमदार देखील झालो. कारण मी लोकांमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे, त्यामुळे लोकांनी मला निवडून दिलं आहे.
कोण आहेत आमश्या पाडवी ?
२०१४ मध्ये शिवसेनेत दाखल झालेल्या पाडवींची शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख अशी चढती कमान राहिली आहे. काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर आदिवासी शिवसैनिक म्हणून पाडवींकडे पाहिले जाते.
अक्कलकुवा तालुक्यातील अंकुशविहीर गावच्या सरपंचपदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे पाडवी १९९८ पासून २०१९ पर्यत २१ वर्षे अक्कलकुवा पंचायत समितीचे सदस्य राहिले आहेत. २००१ ते २००८ या कालावधीत अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
२०१४ मध्ये पाडवी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०१६ साली त्यांच्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्याकडे शहादा, धडगाव आणि अक्कलकुवा या तीन तालुक्यांमध्ये शिवसेना वाढविण्याचे काम सोपवण्यात आले.
जिल्हाप्रमुख असलेल्या पाडवी यांनी २०१४ आणि २०१९ अशा दोन विधानसभा निवडणुका लढविल्या. विधानसभेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांचा अवघ्या दोन हजार ९६ मतांनी पराभव झाला होता. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी हे निवडून आले आहेत.