लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार ?
भाजपाने मांडली रोखठोक भूमिका ; सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ?
एस.के.24 तास
मुबंई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठं यश मिळवलं आहे. पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपयशी ठरलेल्या महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले.
या निवडणुकीत राज्यातील २८८ जागांपैकी ५० जागाही काँग्रेस,शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व त्यांच्या मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीला जिंकता आल्या नाहीत.
तर महायुतीने तब्बल २३५ जागा जिंकल्या आहेत. महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचं श्रेय लाडकी बहीण योजनेला दिलं आहे. महिलांना थेट आर्थिक लाभ देणारी ही योजना निवडणुकीत निर्णायक ठरली असं मत अनेक राजकीय विश्लेषकांनी मांडलं आहे.
त्याचबरोबर महायुतीच्या नेत्यांनी देखील ते मान्य केलं आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा २,१०० रुपये देऊ. राज्यात आता महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात २,१०० रुपये कधी येणार याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान महिलांना २१०० रुपये मिळण्यास ७ ते १० महिने लागू शकतात असं दिसतंय. राज्य सरकारने जाहीर केलं होतं की नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. मात्र नोव्हेंबर महिला उलटला तरी महिलांना या योजनेचा हप्ता मिळालेला नाही.
अशातच महाराष्ट्र भाजपामधील वरिष्ठ नेते व महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरून जाणवतंय की या योजनेंतर्गत महिलांना २१०० रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो. मुनगंटीवार यांनी नुकतीच दी इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्यांनी लाडकी बहीण योजना, या योजनेबाबत महायुतीची भूमिका, निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन व त्यावरील वाढीव खर्चाबाबत रोखठोक भूमिका मांडली.
सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ?
या मुलाखतीवेळी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू. महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण कराल का ?
कारण राष्ट्रवादीने (अजित पवार) म्हटलंय की हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आम्ही १०० टक्के ते आश्वासन पूर्ण करू. महिलांना दिली जाणारी रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल.
निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं. महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून, संकल्प पत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही.
आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला २,१०० रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार ? जानेवारी की जुलै, कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल.
आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो.