आजची स्त्री ही अत्याधुनिक भारताची शक्ती. - डॉ. युवराज मेश्राम
★ ९८ वा मनुस्मृति दहन दिवस
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी - २७/१२/२४ जगाची निर्माती ही स्त्री आहे. आपण सर्व पुरुष हे स्त्री मातृत्वशक्तीची देणगी आहोत. स्त्रियांच्या प्रगती शिवाय कुठलेही राष्ट्र उभे राहू शकत नाही.
हे शाश्वत वैज्ञानिक सत्य असतांना सुद्धा हजारो वर्ष स्त्रिया पुरुषाच्या विषारी अमानुष, क्रूर ,निर्दयी जुलूमाच्या भयावह सामाजिक व्यवस्थेत बंदिस्त होत्या. मनुस्मृतीवर आधारित वर्णव्यवस्थेतील शूद्र आणि भारतीय स्त्रियांना तत्कालीन पशुतुल्य अनिष्ट चालीरीती, कुप्रथा,परंपरा या अमानवी जोखडातून मुक्त करून दास्यातील स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे हक्क, अधिकार आणि आत्मसन्मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृतीचे दहन करून मिळवून दिले.
भारतीय राज्यघटनेतील अधिकारामुळेच भारतीय स्त्रीयांना बुद्धिमत्तेच्या सर्वोच्च शिखरासह पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री , राज्यपाल, न्यायाधीश, संरक्षण क्षेत्रातील अधिकारी, वैज्ञानिक, डॉक्टर, प्राध्यापक, वैमानिक बनून राष्ट्रनिर्मितीकरिता योगदानाची नीव ठेवता आली असे प्रतिपादन कार्यक्रमाध्यक्ष प्रा. डॉ. युवराज मेश्राम यांनी केले.
बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे चौकात महिला आयोजन समितीद्वारे आयोजित मनुस्मृति दहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक प्रा. संजय मगर, डॉ. प्रेमलाल मेश्राम, विद्याताई रहाटे, माजी उपाध्यक्ष न प अशोक रामटेके, प्रा.डॉ. स्निंग्धा कांबळे, प्रा. संतोष रामटेके, प्रा. सरोज शिंगाडे, प्रा. सुप्रिया तलमले, रोशन मेंढे, महिला आयोजन समितीच्या अध्यक्षा सुकेशनी बन्सोड, डी. एम. रामटेके आणि इतर मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
प्रा.संजय मगर यांनी भारतीय संविधानातील राज्य समाजवाद, राज्यघटना निर्मितेतील संसदीय वादविवाद, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 25 नोव्हेंबर १९४९ चे संसदेतील भाषण इत्यादी मुद्द्यावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
डॉ.प्रेमलाल मेश्राम यांनी गटा-तटात विखुरलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन सामाजिक ऐक्य मजबूत करून समाजाने राजकीय प्रतिनिधित्व करावे असे विचार मांडले.प्रा.सरोज शिंगाडे यांनी स्त्रीने घेतलेल्या निर्णयावर स्वतः ठाम असलो पाहिजे.आजचा मनुस्मृती दहन दिन हा खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती दिन आहे. अशोक रामटेके यांनी हिंदू कोड बिल आणि समाजाचे राजकारण यावर भाष्य केले.
प्रा.डॉ. स्निंग्धा कांबळे यांनी भारतीय संविधानातील स्त्रियांचे हक्क व अधिकार, बुद्धाचे समतेचे विचार, स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ, मनुस्मृति दहन दिन इत्यादींवर मार्मिक विवेचन केले. प्रा. संतोष रामटेके यांनी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याकरिता समाजाचे एकत्रिकरण महत्वाचे आहे असे मत मांडले. यावेळी विद्याताई रहाटे,रोशन मेंढे, प्रा. सुप्रिया तलमले, मुख्याध्यापक डी एम रामटेके यांनीही आपले विचार व्यक्त केले.
महिला आयोजन समितीतील शेकडो स्त्रियांच्या आणि प्रमुख मार्गदर्शकांच्या उपस्थितीत मनुस्मृती चे प्रतिकात्मक दहन करून निषेध करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुकेशनी बन्सोड, संचालन आणि आभार भडकेताई यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला आयोजन समितीच्या अध्यक्षा सुकेशनी बन्सोड, किरण मेश्राम, वैशाली रामटेके,शारदा घोरमोडे,अर्चना गणवीर, सरिता धाकडे, मंगला फुले, करुणा मेश्राम,साधना रामटेके, अस्मिता धोंगडे, शालिनी सरोदे, लीलाधर वंजारी, प्रभू लोखंडे, देवानंद मेश्राम इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शेकडो महिलांसह बहुसंख्य मान्यवरांची उपस्थिती होती.