8 लाख बक्षिस असलेले 32 वर्ष नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेल्या नरसिंग या जहाल नक्षलवाद्यासह दोघांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. ★ वर्षभरात 20 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.

8 लाख बक्षिस असलेले 32 वर्ष नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेल्या नरसिंग या जहाल नक्षलवाद्यासह दोघांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण.


★ वर्षभरात 20 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण.


एस.के.24 तास

गडचिरोली : तब्बल 32 वर्ष नक्षलवादी चळवळीत कार्यरत असलेल्या नरसिंग या जहाल नक्षलवाद्यासह दोघांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने नक्षलवादी चळवळीला पुन्हा एकदा हादरा बसला आहे.

एरिया कमिटी मेंबर रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग वय,55 वर्ष रा.गट्टानेली ता.धानोरा) व दलम सदस्य रमेश शामू कुंजाम ऊर्फ गोविंद ऊर्फ रोहित वय,25 वर्ष रा.वेडमेट्टा जि.नारायणपूर (छत्तीसगड) अशी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नावे असून दोघांवर एकूण आठ लाखांचे बक्षीस होते. 

मागील काही वर्षांपासून नक्षलवादाविरोधात पोलीस दलाकडून आक्रमक धोरण रबविण्यात येत आहे. सोबतच प्रशासनाकडून आत्मसमर्पितांसाठी विविध योजना देखील सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पणाकडे कल वाढलेला आहे.

20 डिसेंबरला 1992 पासून नक्षलवादी चळवळीत सक्रिय असलेला जहाल नक्षलवादी नरसिंग आणि रमेश कुंजाम या दोघांनी गडचिरोली पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. दोघांवरही खून, जाळपोळ, चकमक प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल आहेत. 

यातील रामसू दुर्गू पोयाम ऊर्फ नरसिंग हा 1992 पासून नक्षलवादी चळवळीत आहे. 1992 मध्ये तो टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला.1995 मध्ये काकुर दलममध्ये राहुन सन 1996 पर्यंत नक्षलवाद्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांना सुरक्षा देण्याचे काम तो करीत होता.

पुन्हा तो टिपागड दलमसाठी काम करु लागला. पुढे माड एरिया (छत्तीसगड) येथे बदली होऊन 2001 पर्यंत त्याने पुरवठा टीममध्ये काम केले. 2010 पासून तो कुतुल आणि नेलनार दलममध्ये एरिया कमिटी मेंबर (एसीएम) पदावर कार्यरत होता. 

त्याच्यावर 12 गुन्हे नोंद असून 6 चकमक, 5 खून, 1 दरोडा प्रकरणात त्याचा सहभाग राहिलेला आहे. रमेश शामू कुंजाम हा 2019 पासून माओवादी चळवळीत आहे.चेतना नाट्यमंच ,कुतुल दलममध्ये सदस्य म्हणून तो काम करत होता. त्याच्या गुन्हेकृत्याची पडताळणी सुरु आहे.

नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा , पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ 37 बटालीयनचे प्रभारी समादेशक सुजीत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण झाले.

वर्षभरात 20 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

चालू वर्षात आतापर्यंत 20 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.2022 पासून आतापर्यंत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या 33 झाली आहे. माओवाद्यांनी गुन्हे चळवळ सोडून आत्मसमर्पण करुन लोकशाही मार्ग स्वीकारावा , असे आवाहन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !