जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक 7 नक्षलवादी ठार.
एस.के.24 तास
गडचिरोली : छत्तीसगड च्या नारायणपूर - दंतेवाडा सीमावर्ती भागातील अबुझमाडच्या घनदाट जंगलात सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यात सात नक्षल्यांना ठार करण्यात यश आले. गुरुवारी (१२ डिसेंबर) सकाळी हा थरार घडला.
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून १०० किलोमीटर अंतरावर हे घटनास्थळ आहे. एकीकडे गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांची नाकाबंदी केली आहे तर दुसरीकडे छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे.त्यामुळे सध्या नक्षल्यांची धावाधाव सुरू आहे.
छत्तीसगड राज्यातील अबुझमाडच्या जंगलातील नारायणपूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात काही नक्षली दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्याच्या राखीव पोलीस दलासह राज्य राखीव दलाच्या जवानांनी संयुक्त मोहीम राबवली.
नारायणपूर - दंतेवाडा सीमेवर गुरुवारी सकाळी ६ वाजता नक्षल्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यास जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. दुपारी 1:00 वा.पर्यंत चकमक सुरू होती.त्यानंतर नक्षल्यांनी तेथून काढता पाय घेतला.
जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता सात माओवाद्यांचे मृतदेह हाती लागले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. ते सर्व गणवेशात होते. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान केले आहे.
घटनास्थळी आढळलेल्या सात नक्षल्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसामुग्री होती. ते काहीतरी विघातक कृती करण्याच्या तयारीत असावेत. त्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत २१५ नक्षल्यांना छत्तीसगड पोलिसांनी ठार केले आहे. - सुंदरराज पी.विशेष पोलीस महानिरीक्षक बस्तर, छत्तीसगड.