गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात पोलीस कर्मचाऱ्याच्या हातून ट्रिगर दबला यांना 3 गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू .

गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात पोलीस कर्मचाऱ्याच्या हातून ट्रिगर दबला  यांना 3 गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू .


एस.के.24 तास


गडचिरोली : येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश वसंत कुळकर्णी यांच्या सुरक्षेसाठी तैनात सशस्र पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याच्या एके-47 रायफलमधून धडाधड सुटलेल्या तब्बल 8 गोळ्यांच्या आवाजाने जिल्हा न्यायालयाचा परिसर हादरून गेला. ही घटना बुधवारी (दि.11) दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. यात ज्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातून ट्रिगर दबला ते उमाजी होळी (42 वर्ष) यांना 3 गोळ्या लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. चुकून ट्रिगर दबल्याने ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली जात आहे.

काही दिवसांपूर्वीच गडचिरोलीत रुजू झालेले जिल्हा सत्र न्यायाधिश वसंत कुळकर्णी यांना वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनासोबत सशस्र पोलीस कर्मचाऱ्यांचे एक वाहन नेहमीसाठी तैनात असते. 

बुधवारी दुपारी लंच ब्रेकनंतर न्या.कुळकर्णी यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानावरून जिल्हा न्यायालयात सोडल्यानंतर सुरक्षा रक्षकांचे वाहन न्यायालयाच्या आवारात पार्क करण्यात आले होते. चालकासह तीन सुरक्षा रक्षक गाडीतून खाली उतरले, पण उमाजी होळी हे गाडीतच बसून होते. थोड्याच वेळात गाडीतून धडाधड फायरिंग होत असल्याच्या आवाजाने सर्वांचे लक्ष तिकडे वेधल्या गेले.

सुरूवातीला 3 गोळ्यांचे आवाज आले. त्यानंतर पुन्हा काही गोळ्यांचे आवाज आले. प्रत्यक्षात होळी यांच्या एके-47 रायफलमधून 8 गोळ्या सुटल्या होत्या. त्यातील 3 गोळ्या उमाजी यांच्या छातीतून आरपार गेल्या होत्या तर 5 गोळ्या वरच्या बाजूने गाडीच्या टपातून बाहेर गेल्या होत्या. गोळ्या सुटत असताना गाडीजवळ जाणे धोक्याचे असल्याने खाली उतरलेले सुरक्षा रक्षक जवळ गेले नाही.


पण आवाज थांबल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेतली. यावेळी तीन गोळ्या लागलेल्या अवस्थेत मधल्या सीटवर बसलेले उमाजी होळी यांनी स्वत:च गाडीचे दार उघडले. त्याचवेळी बाहेर असलेल्या सोबतच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना उचलून रुग्णालयाकडे धाव घेतली. पण अतिरक्तस्राव झाल्याने काही वेळातच होळी यांचा मृत्यू झाला.

ही घटना आत्महत्या आहे की अपघात हे पूर्णपणे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र प्रथमदर्शनी हा अपघातच असण्याची शक्यता असून होळी यांच्या हातून अनावधानाने बंदुकीचा ट्रिगर दबल्याने गोळ्या बाहेर पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक नीलोत्पल व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात भेट देऊन माहिती दिली. तसेच मृत उमाजी होळी यांच्या कुटुंबियांना पोलीस दलाकडून सर्व मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !