विदर्भात महायुतीची लाट ; विरोधक भुईसपाट.
एस.के.24 तास
नागपूर : विदर्भावरील राजकीय वर्चस्वासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती व काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना झाला. परंतु, महायुतीच्या प्रचंड लाटेत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. या विदर्भातील ६२ पैकी तब्बल ४८ जागांवर महायुतीने बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीला फक्त १३ जागांवरच समाधान मानावे लागले.
पूर्व विदर्भात ३२ तर पश्चिम विदर्भात ३० अशा एकूण ६२ जागा असलेल्या विदर्भात लोकसभेप्रमाणेच निवडणुकीचे निकाल लागतील, असा अंदाज वर्तवला जात होता. लाडकी बहीण योजनेच्या प्रभावामुळे काही उलटफेर होतील,पण ते मर्यदित स्वरूपात असतील,अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
पण, मतदारांनी ते साफ खोटे ठरवत महायुतीच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकल्याचे निकालातून स्पष्ट होते. ६२ पैकी ४८ जागा महायुतीला मिळाल्या.भाजपने ४७ जागा लढवल्या व ३७ जिंकल्या, शिवसेनेने सातपैकी चार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सहापैकी सर्व सहा जिंकल्या.
या उलट महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. त्यांना फक्त १३ जागा मिळाल्या.काँग्रेस ४१ पैकी फक्त ९,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ९ पैकी चार जागांवर समाधान मानावे लागले.शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विदर्भात एकही जागा मिळाली नाही.विदर्भ हा भाजपचाच बालेकिल्ला असल्याचे या निकालाने दाखवून दिले.
पूर्व विदर्भातही ३२ जागांपैकी सर्वाधिक जागा भाजपनेच जिंकल्या.शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या जागा कायम राखल्या. राष्ट्रवादी शरद पवार गटाने काटोलची जागा गमावली.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही निसटता विजय झाला.
अजित पवार गटाची कामगिरी सरस : -
२०१९ च्या निवडणुकीत एकसंध राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या होत्या. या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने १२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सहा जागा लढवल्या होत्या.पण शरद पवार यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. अजित पवार गटाने मात्र लढवलेल्या सर्व सहा जागा जिंकल्या.
पश्चिम विदर्भात काँग्रेसला धक्का : -
अमरावती : पश्चिम विदर्भात गेल्या निवडणुकीप्रमाणेच भाजपने आपले स्थान अधिक भक्कम केले. काँग्रेसला मोठा फटका बसला. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत ५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागेल.
शिवसेनेला गेल्या निवडणुकीत एकूण ४ जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पश्चिम विदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपले स्थान बळकट करीत ४ जागांवर पुन्हा विजय प्राप्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीत केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. पक्ष फुटीनंतर या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने तीन जागांवर विजय पक्का केला आहे.
फडणवीस सहाव्यांदा, मुनगंटीवार सातव्यांदा विजयी : -
संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा तर एकूण सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकले. या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस चे प्रफुल गुडधे पाटील यांचा ३९ हजार मतांनी पराभव केला.
फडणवीस यांनी पश्चिम नागपूर या मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक जिंकली आहे. त्याचप्रमाणे भाजप नेते व वनमंत्री,सुधीर मुनंगटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवला.यापूर्वी त्यांनी तीनवेळा चंद्रपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता.
प्रमुख विजयी उमेदवार : -
● देवेंद्र फडणवीस (द. पश्चिम- भाजप)
● चंद्रशेखर बावनकुळे (कामठी-भाजप)
● धर्मरावबाबा आत्राम ( अहेरी-अजित पवार)
● संजय राठोड (दिग्रस-शिवसेना)
● सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर-भाजप)
● विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी-काँग्रेस)
● नाना पटोले (साकोली-काँग्रेस)
प्रमुख पराभूत उमेदवार
● बच्चू कडू (प्रहार-अचलपूर)
● यशोमती ठाकूर (काँग्रेस-तिवसा)
● राजेंद्र शिंगणे (शरद पवार-सिं.राजा)
● अनुजा सुनील केदार (काँग्रेस-सावनेर)
● सलील अनिल देशमुख (काटोल-शरद पवार)