आरमोरी येथे महामंडळ च्या बस मधून दारुची तस्करी ; ब्रम्हपुरी येथील महिलेला अटक.
एस.के.24 तास
आरमोरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक व पोलिस विभागाकडून ठिकठिकाणी वाहने अडवून कसून तपासणी केली जात आहे.त्यामुळे अनेक दारू तस्कर दारूची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करताना दिसून येत आहेत. तरीही पोलिसांनी सतर्कतेने मंगळवारी महामंडळ च्या बस मध्ये दारु पकडली.
एक दारू तस्कर महिला महामंडळाच्या बसमधून दारू तस्करी करीत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी सदर एसटी बसमधून दारू तस्करी करणाऱ्या महिले कडून 21 हजारांची दारु जप्त करीत तिला ताब्यात घेतल्याची कारवाई 12 नोव्हेंबर रोजी आरमोरी मार्गावरील बसथांब्याजवळ केली.
रितादेवी देवेंद्र मिश्रा रा.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर असे आरोपी महिलेचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून रितादेवी मिश्रा ही महिला रापम च्या बसने दारू तस्करी करत असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने शहरातील आरमोरी मार्गावरील बस थांब्यावर सापळा रचला.
दरम्यान,एसटी बस आरमोरी मार्गावरील बस थांब्यावर येताच पोलिस कर्मचाऱ्यांनी बसची तपासणी करून महिला तस्कर कडून 21 हजार रुपये किमतीची देशी दारु जप्त केली. पोलिसांनी संबंधित महिलेवर कारवाई करत गुन्हा दाखल केला.
तसेच डीबी पथकाने पोलिस ठाणे हद्दीतील इंदाळा येथील सुबल हिरामण मिस्त्री याच्या घरावर छापा टाकून त्याच्या घरातून 7 हजार रुपयांची दारू जप्त केली.