गडचिरोली भाजपचे डॉ.मिलिंद नरोटे,अहेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम,आरमोरी काँग्रेसचे रामदास मसराम विजयी.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी मतदारसंघात महायुतीला वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले. तर आरमोरीत भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने यश संपादन केले. मतमोजणी च्या सुरवातीला अत्यंत चुरशीचा ठरलेला सामना शेवटी एकतर्फी झाल्याने गडचिरोलीत भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम आणि आरमोरीत काँग्रेसचे रामदास मसराम विजयी झाले.
महायुतीमध्ये अहेरीत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सामना कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व भाजपचे बंडखोर पुतणे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी झाला. ही लढत राज्यात लक्षवेधी होती. मात्र, तेथे धर्मरावबाबा आत्राम यांनी १८ हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजय खेचूण आणत अहेरीवरील हुकूमत अबाधित ठेवण्यात यश मिळवले. दुसरीकडे गडचिरोलीत भाजप व काँग्रेसने नवे चेहरे मैदानात उतरवले होते.
भाजपने विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांना नाकारुन डॉ.मिलिंद नरोटे या नव्या तरुण उमेदवाराला संधी दिली होती. डॉ. नरोटे यांनी १४ हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसच्या मनोहर पोरेटी यांना पराभवाची धूळ चारुन विजय नोंदवला. तर आरमोरीत भाजपने कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी दिली. हॅटट्रिकच्या उंबरठ्यावरील गजबे यांचा सामना काँग्रेसच्या रामदास मसराम यांच्याशी झाला.
नवख्या मसराम यांनी ५ हजार ७८२ इतक्या मतांनी पराभूत करुन गजबे यांच्या वर्चस्वाला जोरदार हादरा दिला.